

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त रायगडावर होणार्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात आंबेगाव येथे शिवरायांच्या संकल्पनेवरील उद्यानासाठी 50 कोटींची तरतूद केली. तसेच शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
मंत्री फडणवीस यांनी पंचामृत संकल्पनेवर अर्थसंकल्प सादर केला. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना काही ना काही लाभ मिळेल, याची काळजी अर्थसंकल्पात घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते. पायाभूत विकासाचा प्रकल्प, वैशिष्ट्यपूर्ण घोषणा केल्या असल्या, तरी पश्चिम महाराष्ट्रातील विविध स्मारकांच्या विकासाला अर्थसंकल्पात प्राधान्य मिळाले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचा 270 कोटींचा विकास आराखडा, पुण्यातील भिडे वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी, सांगलीच्या वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मस्थळाचा विकास आणि स्मारकासाठी 25 कोटी, सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी 20 कोटी तसेच श्री संत जगनाडे महाराजांच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील समाधिस्थळाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली.
स्मारकांसोबतच विश्वकोश कार्यालयासाठी वाई येथे इमारत बांधण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. तसेच कोल्हापूर चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांच्या निर्मितीचा उल्लेख केला आहे; तर सांगली जिल्ह्यात नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांच्या आघाडीवर पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
कोकणातून जाणारा सागरी महामार्ग 9 हजार कोटी, दुसरा शक्तिपीठ महामार्ग 7700 कोटी, कोकणच्या खारभूमी विकास आणि जलसिंचन 1560 कोटी, त्यात वैद्यकीय महाविद्यालये ठाणे-वसई जलवाहतूक 238 कोटी, मच्छीमारांना 269 कोटी आणि उत्तर कोकणातील पाच नद्यांचा नदीजोड प्रकल्प करून त्याचे पाणी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राला देण्याच्या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ठाणे, नवी मुंबई, उरण, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, निवती, वेंगुर्ले, तेरेखोल, पणजी असा हा सागरी महामार्ग आहे. यासाठी 9 हजार कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावर 9 नवीन शहरे वसवली जाणार आहेत.
नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्ग असून, तो 860 किलोमीटरचा आहे. समृद्धी महामार्गाचे काम 88 टक्के पूर्ण झाले असून याच महामार्गाचा शक्तिपीठ महामार्ग एक भाग असणार आहे. महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गातून माहुर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. तसेच पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर ही तीर्थस्थळेही जोडली जाणार आहेत.