शिंदे की ठाकरे? राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर बुधवारी सुनावणी

File Photo
File Photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरीक्षणे नोंदवणार आणि कोणता निकाल देणार, राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे बाजी मारणार की ठाकरे, याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता, यावरही सुनावणी घेईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या तीन सदस्यीय खंडपीठात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असणार आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. या कार्यवाहीविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व 14 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पायउतार झाले. मात्र, त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. शिवसेनेने शिंदे यांची विधानसभा गटनेतेपदावरून हकालपट्टी करत या पदावर अजय चौधरी यांची निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेकडूनही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news