विधान भवनातून : अवकाळी पाऊस सभागृहात; पुन्हा सरकारची कोंडी

विधान भवनातून : अवकाळी पाऊस सभागृहात; पुन्हा सरकारची कोंडी

सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले तेच सरकारविरोधी शिमग्याने! काल-परवाच्या अवकाळी पावसाने राज्यातल्या शेेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. विरोधकांनी आज विधानभवनात प्रवेश करताच पायर्‍यांवरच घोषणाबाजी सुरू केली. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, नुकसानीचे पंचनामे करा, अशा विरोधकांच्या मागण्या होत्या. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

वास्तविक, कालच पाऊस झाल्यानंतर पंचनामे व्हायला, नुकसानीचा अंदाज यायला किमान दोन दिवस तरी हवेत. सलग सुट्ट्या आल्याने यंत्रणाही सुस्तावलेली! अशा परिस्थितीत विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यावर तातडीने राज्यभरातून नुकसानीचा प्राथमिक अंदाज मागवला गेला आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. त्यानंतर विरोधक शांत झाले.

बुधवारी जागतिक महिला दिवस असल्याने सभागृहात सालाबादप्रमाणे तो साजरा होणार, हे गृहीतच होते. मात्र, आज केवळ महिला आमदारांच्या लक्षवेधी लावून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. आज विधानभवन परिसरातही महिला दिनाचे वातावरण होते. विशेषतः, विविध वृत्तवाहिन्यांच्या महिला पत्रकार साडी नेसून नटूनथटून आल्या होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेत महिला धोरणासंदर्भात चर्चा झाली. यावेळी महिला आमदारांनी चर्चेत भाग घेताना संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही, अशी खंत व्यक्त केली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तर मंत्रिपदे दिल्यावरही महिलांना खाती मात्र दुय्यम दर्जाची दिली जातात; अर्थ, नगरविकास, महसूल, अशी खाती ज्या दिवशी महिलांकडे जातील आणि महिला मुख्यमंत्री होईल तेव्हा खरा महिला दिन असेल, असे म्हणाल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला आमदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले गेले.

महिला दिनाचा उत्साह असा ओसंडून वाहत असताना आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आले होते. ठाकरे यांच्याबद्दल मीडियात मोठी उत्सुकता असल्याने त्यांचा बाईट घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. मात्र, उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत. विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे आज सभागृहात तासभर बसले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही यावेळी सभागृहात होते. सभागृहातून बाहेर पडल्यावर उद्धव यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे दालन गाठले आणि तेथेच आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील विधानभवनात धडकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बराच वेळ बसल्यानंतर ते माध्यमांना सामोरे गेले आणि नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करून निघून गेले!
गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करतील. प्रथेनुसार विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री बजेट सादर करतात. मात्र, शिंदे सरकारमध्ये अर्थ खात्याला राज्यमंत्रीच नसल्याने परिषदेत कोण बजेट मांडणार? हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांकडून सहा नावे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडे पाठवली जातील आणि त्यातून एक नाव निश्चित केले जाईल. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई हे बहुतेक परिषदेत बजेट मांडतील, अशी शक्यता आहे.

                                                                                                  – उदय तानपाठक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news