रेल्वे तिकिट दरात कपातीनंतर फर्स्ट क्लासकडून एसीकडे जाण्यास प्रवासी नाखूश

रेल्वे तिकिट दरात कपातीनंतर फर्स्ट क्लासकडून एसीकडे जाण्यास प्रवासी नाखूश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  एसी लोकलची प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी तिकिट दरात कपात केल्यानंतर रेल्वेने फस्ट क्लासच्या प्रवाशांना त्यांच्या पासाचे रुपांतर एसी लोकलच्या पासात करण्याची सुविधा उपलब्ध केली. परंतु फस्ट क्लासच्या पासाचे एसी लोकलमध्ये रुपांतर करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत फस्ट क्लासचे केवळ 155 पास एसी लोकलच्या पासमध्ये रुपांतरित करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017 रोजी पहिली एसी लोकल चालविण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेवर देखील एसी लोकल सुरू करण्यात आली. एसी लोकलच्या तिकिट दरात 5 मे पासून 50 टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेर्‍या देखील काही दिवसांत वाढवल्या आहेत.
सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दिवसभरात एसी लोकलच्या 40 तर मध्य रेल्वेवर 56 फेर्‍या चालविण्यात येतात. एसी लोकलची वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वेने फस्ट क्लासचे प्रवासी एसी लोकलकडे वळविण्यासाठी पासाचे रुपांतर करण्याची सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली. परंतु याकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे.

पासाची मुदत संपण्याची वाट
फस्ट क्लासच्या पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढ्याच दिवसांचा पास एसी लोकलच्या पासात रुपांतरित करण्याची सुविधा नाही. त्यासाठी संपूर्ण महिन्याभराचा पास काढावा लागतो. त्यामुळे फस्ट क्लासचा पास काढलेले प्रवासी कदाचित आपल्या पासची मुदत संपण्याची वाट पाहत असावेत.
एप्रिल ते जूनपर्यंत फस्ट क्लासचे 155 पास एसी लोकल पासमध्ये रुपांतर केले आहेत. एप्रिलमध्ये 49, मे महिन्यात 59 आणि जूनमध्ये 47 पास रुपांतरित झाले. सध्या एसी लोकलमध्ये पंधरा दिवस, एक महिन्याचा आणि तीन महिने पासाची सुविधा उपलब्ध आहे. मे मध्ये एकूण 14 हजार 221 पास आणि जूनमध्ये 11 हजार 215 पास काढले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news