राणीबागेतील १२० वर्षीय ‘प्याऊ’ पर्यटकांचे ठरतेय आकर्षण!

राणीबागेतील १२० वर्षीय ‘प्याऊ’ पर्यटकांचे ठरतेय आकर्षण!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय (राणीबाग) येथील सुमारे १२० वर्षीय 'सेठ सामलदास नरसीदास प्याऊ' चे संवर्धन करुन त्याला जपानी पद्धतीच्या 'कोई फिश पाँड' ची जोड देण्यात आली आहे. या प्याऊसोबत अन्य चार प्याऊचे संवर्धन करण्यात आल्यामुळे हे प्याऊ पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाण, रस्ते, बाजारपेठा, बंदरे, औद्योगिक क्षेत्र, उद्याने, ट्राम अथवा रेल्वे स्थानकांच्या बाहेर नागरिकांना आणि प्राणी, पक्षी यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. यातील अनेक पाणपोई शहराच्या विकासात कायमच्या इतिहासजमा झाल्या. दक्षिण व मध्य मुंबईत तर आता मोजक्याच पाणपोई शिल्लक आहेत. यातील बंद पडलेल्या पाणपोई राणीबागेमध्ये हरवण्यात आल्या होत्या. यात मरीन लाईन्स व वाळकेश्वर येथील १९०३ मधील पाणपोईचा समावेश आहे. राणीबागेत ठेवण्यात आलेल्या चार पुरातन प्याऊंचे संवर्धन करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

राणीबागेतील चारही प्याऊंची निर्मिती १९०३ ते १९३३ या कालावधीमध्ये झालेली आहे. वारसा स्तर ३ स्थापत्य प्रकारामध्ये हे चारही प्याऊ मोडतात. चार प्याऊंपैकी पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण ठरतेय 'सेठ सामलदास नरसीदास प्याऊ'. हा प्याऊ सेठ सामलदास नरसीदास यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मातोश्री लवेरबाई नरसीदास यांनी १९०३ मध्ये बांधला होता. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या प्याऊच्या चारही बाजूला सिंहाच्या आकाराच्या मुखातून पाणी वाहण्याची सोय आहे. प्याऊचे संवर्धन करताना त्याला एक दगडी कळस व भक्कम दगडी जोत देण्यात आले. त्यामुळे त्यांचे कारंजामध्ये पुनश्च रुपांतर झाले. राणीबागेत एक गोलाकार दगडी विहिरीसारखी पाणथळ जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या प्याऊला या जागेच्या मधोमध पुनर्स्थापित करुन कारंजा बनवण्यात आले आहे.

कोई फिश पॉंड म्हणजे

कोई फिश पॉंड ही संकल्पना मूळची जापनीज आहे. कोई • फिश पाँडमध्ये रंगबिरंगी मासे सोडले जातात. या माशांचा रंग हा केशरी, पिवळा आणि निळा अशा स्वरूपाचा असतो. साधारणपणे २५ ते ३० वर्षे इतके आयुष्यमान या कोई प्रजातींच्या माशांना असते. व अशी तळी जपानमध्ये समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

३० प्याऊंचे संवर्धन

काळाच्या ओघात या पुरातन प्याऊ वापरातून बाद होवून तसेच देखभाल, दुरुस्ती अभावी अडगळीत पडल्या होत्या. परंतु पालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत संपूर्ण मुंबईतील तब्बल ३० प्याऊंचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी या चार प्याऊंसह अन्य नऊ प्याऊंचे संवर्धन व पुनर्स्थापन पूर्ण झाले आहे. उर्वरित प्याऊंची कामे प्रगतिपथावर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news