मुलीला आयटम संबोधणे लैंगिक शोषणच! पोक्सो न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

file photo
file photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या मुलीला आयटम म्हणणे हे एक प्रकारे लैंगिक शोषणच आहे, असे निरीक्षण नोंदवीत पोक्सो न्यायालयाने 25 वर्षांच्या आरोपी तरुणाला दीड वर्षांचा कारावास ठोठावला. या निकालामुळे नाक्यानाक्यांवर मुलींना छेडणार्‍या रोमियोंमध्ये दहशत निर्माण होऊ शकते.

ही घटना तशी सात वर्षांपूर्वीची आहे. 2015 मध्ये 16 वर्षीय पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना एका 25 वर्षीय व्यावयासिकाने तिची वाट अडवली आणि 'क्या आयटम, किधर जा रही हो', असे विचारले. एवढेच नव्हे तर तिचे केसदेखील ओढले. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध विशेष पोक्सो न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांच्यासमोर खटला सुरू झाला. याप्रकणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आल्याचा बचाव आरोपीने केला. पीडितेच्या कुटुबीयांना त्या दोघांच्या मैत्रीला विरोध होता. त्यामुळे या खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचेही आरोपीच्या वकिलांनी सांगितले. मात्र, आरोपीने केलेला मैत्रीचा दावा पीडितेच्या जबाबामुळे खोटा ठरला. तिने आपल्या जबाबात कुठेही तसे म्हटलेले नाही. तसेच खटल्यातील अन्य साक्षीदारांनीही तसा उल्लेख केलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आरोपीने केलेली कृती सकृतदर्शनी लैंगिक शोषण असल्याचे स्पष्ट करत महिलांसोबत होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी अशा रोडसाईड रोमियोंना धडा शिकवणे आवश्यक असल्याचे परखड मत व्यक्त करत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार देत दीड वर्षांची शिक्षा ठोठावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news