मुंबईतील नदीकिनारे होणार पर्यटन स्थळे !

मुंबईतील नदीकिनारे होणार पर्यटन स्थळे !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये आता भर पडणार आहे. येणाऱ्या काळात नदी किनाऱ्यांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर होणार आहे. यापैकी दहिसर नदीच्या पुनरुज्जीवन काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे.. पोईसर व ओशिवरा नद्यांच्या कामाचेही आदेश देण्यात आले आहेत.

मिठी नदीनंतर आता पश्चिम उपनगरातील दहिसर, पोयसर व ओशिवरा या नद्यांच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यात नद्यांचे रुंदीकरण व पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात येणार आहे. त्यामुळे या नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात नद्यांच्या काठावरील अतिक्रमणे हटवून नद्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यावेळी पूर नियंत्रण रेषाही निश्चित करण्यात येणार आहे. नद्यांमध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी थांबवण्यासह मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यात येणार आहेत.

दहिसर नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरता कार्यादेश देण्यात आले असून सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आयआयटी मुंबईने आराखड्यांना मान्यता दिल्यामुळे प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. पोईसर नदीच्या सर्वेक्षणाचे व संकल्प चित्र बनवण्याचे काम सुरू आहे. नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारून नदी किनाऱ्यालगत उद्यान, हिरवळ व पर्यटकांसाठी अन्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी नौकाविहारही करता येणार आहे. त्याशिवाय पुरेशी पार्किंग व हॉटेलची व्यवस्थाही राहणार आहे. नद्यांच्या पुनर्विकासानंतर नदी किनारे पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news