मुंबईतील कबुतरखाने बेकायदेशीर!

मुंबईतील कबुतरखाने बेकायदेशीर!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : समाजातील मुठभर कबूतर प्रेमींमुळे लाखो मुंबईकरांना श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने कबुतरांच्या बंदोबस्तासाठी पाच वर्षांपूर्वीच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. तसे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मात्र, राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर कबूतरखाना व कबूतर प्रेमींवर कारवाई करण्यात अडथळे येत आहेत. यामुळे पालिका प्रशासनही हतबल झाले आहे.

या कबूतरखान्यासह मुंबईत शेकडो कबूतरखाने आहेत. मात्र, याची कोणतीही नोंद महापालिकेच्या दप्तरी नाही. या कबूतर खाण्याबद्दल शेकडो तक्रारी मुंबई महापालिका विभाग कार्यालयात येतात. मात्र, कबूतरखान्यांवर कारवाई करण्याची पालिका प्रशासनाची हिंमत झालेली नाही. याला कबूतर प्रेमी समाजाच नाही तर, या समाजाला मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेपही कारणीभूत आहे. महापालिकेने दादर कबूतरखान्यासह अन्य कबूतर खाण्याबाहेर दंडात्मक कारवाईचे फलकही लावले आहेत. त्यानुसार नागरिक तक्रारी करतात. मात्र, काही अपवाद वगळता कोणताही पुरावा नसल्यामुळे कारवाई करणे शक्य होत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील दादर येथील कबूतर खाण्याला हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा कबूतरखाना पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. पण हा कबूतरखाना आपल्यासाठी किती हानिकारक आहे, याची पुसटशीही कल्पना अनेक पर्यटकांना नाही. त्यामुळे येथे हजारो कबुतरांसोबत सेल्फी काढताना पर्यटक दिसून येतात. अशाच प्रकारचे कबूतरखाने मुंबई शहरात एका विशिष्ट समाजाच्या पशुपक्षी प्रेमामुळे तयार झाले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फोर्ट या विभागातील जनरल पोस्ट ऑफिस समोरील हेरिटेज कबूतरखान्यासह गिरगाव, प्रार्थना समाज, ग्रँटरोड, कांदिवली, गोराई, चारकोप, बोरिवली, घाटकोपर, मुलुंड आदी भागात मोठ्या प्रमाणात कबूतरखाने दिसून येतात.

कबुतरांसाठी रुग्णवाहिका!

कबूतर वाचवण्यासाठी मुंबई शहर व उपनगरात करुणा संस्थेसह अनेक सामाजिक संस्थांच्या २५ ते ३० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. संक्रांतीच्या वेळी पतंगांच्या धाग्याने जखमी होणाऱ्या कबुतरांना वाचवण्यासाठी या संस्थांची वैद्यकीय टीमही मुंबई ठिकठिकाणी कार्यरत असते. यावेळी रस्त्यावर अनधिकृतरित्या वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात येतात. पण यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही.

कबूतरखाने हटवणे अशक्य!

मुंबई शहर व उपनगरात अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले कबूतरखाने हटवण्याचा महापालिकेने अनेकदा प्रयत्न केला. पण याला जोरदार विरोध होत असल्यामुळे कबूतरखाने हटवणे शक्य झाले नाही. कांदिवलीमध्ये कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज व पालिकेमध्ये जोरदार वादही झाला होता. यावेळी कबुतरांना धान्य घालण्यास पालिकेने मनाई केली होती. काहींना धान्य घालताना पकडण्यातही आले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई करणे शक्य झाले नसल्याचेही पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news