मुंबईत सेना भवनासमोर शिवसैनिकांचे शक्‍तिप्रदर्शन

मुंबईत सेना भवनासमोर शिवसैनिकांचे शक्‍तिप्रदर्शन
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून संतापलेल्या शिवसैनिकांनी रविवारी दुपारी बाईक रॅली काढत दादर शिवसेना भवना समोरील रस्ता रोखून बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
माजी महापौर, नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत माहीम, धारावी, वडाळा विधानसभेतील अनेक पदाधिकार्‍यांसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांनी हातात भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी… , शिवसेना झिंदाबाद…, उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी जोरदार घोषणाबाजी करत बंडखोर आमदार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
शिवसेना भवनासमोरील चौकात माहीम धारावी येथून निघालेली बाईक रॅली अचानक थांबल्याने एकच खळबळ उडून वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना राजीनामा देण्यास सांगून शिवसेनेच्या नावाचा तसेच बाळासाहेबांचा फोटोचा तसेच चिन्हाचा वापर न करता निवडून आणावे असे आवाहन करत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या महिला शिवसैनिकांनी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या आमदारांना शिवसैनिक त्यांच्याच प्रभागात गाडून टाकतील असा निर्धार व्यक्त केला. शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य म्हणाले शिवसेनेच्या मतांच्या जोगव्यावर बंडखोर आमदार निवडून आले. शिवसेना प्रमुखांच्या फोटोवर, सेनेच्या धनुष्य चिन्हावर, शिवसेना चार अक्षरी नावावर फक्त शिवसेनेचा अधिकार आहे. या बंडखोरीला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळाला असून ते बंड करण्यास खतपाणी घालत आहेत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

उपविभाग प्रमुख महादेव शिंदे म्हणाले शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांना माफी नाही. धारावी, माहीम तसेच वडाळा विधानसभा क्षेत्रात शिवसेना विभागप्रमुख बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून सर्वच विधानसभा क्षेत्रात बंडखोर आमदार सरवणकर यांच्या निषेधाचे फलक झळकत आहेत. सरवणकर यांनी दुसर्‍यांदा शिवसेनेशी गद्दारी केली आहे या गद्दाराला माफी नाही अश्या तीव्र शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यभरात आंदोलन

बंडखोरांविरोधात आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रविवारी मोठ्या संख्येने उतरले. नांदेड, औरंगाबाद आणि येरवडा आदी ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळाले. बंडखोरांच्या विरोधात शिवसेनेने नांदेडमध्ये आंदोलन केले. शिवसैनिकांनी आयटीआय चौकात बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात आंदोलन केले.
शिवसैनिकांनी बंडखोरांना विरोधात जोरदार घोषणा देत कल्याणकर यांच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर शिंदे आणि कल्याणकर यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

औरंगाबाद शहरामध्ये क्रांती चौकात बंडखोरांविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले.गद्दारी करणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने स्व. बिंदुमाधव ठाकरे चौकात रविवारी तीव्र निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news