मुंबईत आज नो हॉकिंग डे, विनाकारण हॉर्न वाजवाल तर कारवाई

मुंबईत आज नो हॉकिंग डे, विनाकारण हॉर्न वाजवाल तर कारवाई

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  वाढते ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बुधवारी संपूर्ण शहरात नो हॉकिंग डे ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत असलेल्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज तब्बल ९२ ते ११२ डेसिबल असून निर्धारित मर्यादेपेक्षा तो २० ते २७ डेसिबलने जास्त आहे.

अनावश्यक हॉर्न वाजविल्याने ध्वनी प्रदुषणात वाढ होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने नो हॉकिंग डे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांमध्ये हॉर्नविषयी जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हॉर्नचा वापर टाळून वाहन चालकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मधील नियम ११९ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाहनांचे हॉर्न असावे असेही पोलिसांनी सांगितले आहे.
सध्या मुंबईतील वाहनांच्या हॉर्नचा आवाज हा ९२ ते ११२ डेसीबल आहे. जो ध्वनी प्रदूषणाच्या ठरवून दिलेल्या ८५ डेसीबल मर्यादे- पेक्षा अधिक आहे. तो कमी करण्यासाठी पोलिसांकडून वाहन, हॉर्न निर्मात्या कंपन्यांसोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या कंपन्यांचा प्रतिसाद कळू शकलेला नाही.

हॉर्न कुणाचा वाजतो?

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, गांधी नगर जंक्शन, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, पेडर रोड, मोहम्मद अली रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्ससह चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, सायन, घाटकोपर, धारावी, दहिसर, कांदिवली, बोरिवली, अंधेरी, वांद्रे, माहीम, दादर हिंदमाता येथील जंक्शन अशा १०० हून अधिक ठिकाणी आणि ५९ अधिक जंक्शनवर मोठ्या प्रमाणात विनाकारण हॉर्न वाजविले जातात.

हॉर्न वाजवणे ही तर प्रवृत्ती

मुंबईतील काही वाहन चालकांकडून विनाकारण हॉर्न वाजवले जातात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि मुंबईतील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडून नो हॉकिंग डे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाहन चालकांनी या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देऊन कोणीही हॉर्न न वाजवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. या मोहिमेतून रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक वाहनांना वगळण्यात आले आहे. वाहनांचा अनावश्यक हॉर्न वाजविणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानव्ये कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण पडवळ, सह आयुक्त वाहतूक शाखा, मुंबई पोलिस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news