

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जाणारे भारतीय पोलिस सेवेतील 1994 च्या तुकडीचे अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलिस आयुक्त हे त्यांच्यासाठी नवे पद निर्माण करण्यात आले आहे. हे पद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहणार असले, तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्तांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस सरकारच्या 2014 ते 2019 या कालावधीत भारती हे मुंबई पोलिस दलातील सर्वात प्रभावी अधिकारी म्हणून ओळखले जात होते. फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकार्यांपैकी ते एक होते. मात्र, राज्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भारती यांची तुलनेने दुय्यम मानल्या जाणार्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. गेल्यावर्षी जून महिन्यात सत्तांतर होऊन गृह खात्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर देवेन भारती यांचा प्रभाव पुन्हा दिसू लागला आहे.
गृह विभागाने 13 डिसेंबरला पोलिस बदल्यांचे आदेश जारी करताना भारती यांच्याजागी राजवर्धन यांची नियुक्ती केली. त्यामुळे भारती यांच्यासाठी मुंबईत विशेष पोलिस आयुक्तपद निर्माण करून तेथे त्यांची वर्णी लावली जाईल, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारती यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश गृह विभागाने बुधवारी जारी करून भारती यांच्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.