मुंबई : ‘हॉल्ट स्टेशन’ ते नवीन ‘बिझनेस हब’

मुंबई : ‘हॉल्ट स्टेशन’ ते नवीन ‘बिझनेस हब’
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
'हॉल्ट स्टेशन' असलेल्या भिवंडी रोड स्थानकाची ओळख आता नवीन 'बिझनेस हब' अशी झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भिवंडी रोड स्थानकाने 19 हजार 234 टन पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 10 कोटींचा महसूल जमा केला आहे.

कोरोनाकाळात मध्य रेल्वेने भिवंडी रोड स्थानकातून मालवाहतुकीला प्राधान्य दिले. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सर्वात यशस्वी 'बिझनेस डेव्हलपमेंट युनिट' म्हणून ओळखले जात आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान भिवंडी रोड बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने 16.21 लाख पॅकेजमध्ये 19,234 टन पार्सल पाठवून 10 कोटी 33 लाखांचे उत्पन्न मिळवले. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 10.41 लाख पॅकेजमधून 14,963 टन पार्सल पाठवून 8 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल भिवंडी स्थानकाने मिळवला होता.
शालिमार येथे सर्वाधिक 7.09 लाख पॅकेजमधून 7,875 टन पार्सल पाठवण्यात आली. त्यानंतर आजरा (गुवाहाटी) येथे 4.39 लाख पॅकेजमधून 6,621 टन पार्सल, संकराईल गुड्स यार्डला (हावडा) 2.90 लाख पॅकेजमध्ये 2,627 टन पार्सल पाठवण्यात आली. उत्पन्नाच्या बाबतीत आजरा 3 कोटी 98 लाख महसुलासह आघाडीवर आहे, त्यानंतर शालिमार 3.97 कोटींसह दुसर्‍या आणि संकराईल 1.31 कोटींसह तिसर्‍या स्थानावर आहे. फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि सौंदर्यप्रसाधने आदी सामग्रीची वाहतूक करण्यात आली.

मुंबई आणि ठाणे शहरांजवळ असलेल्या भिवंडीची उत्तर-दक्षिण व जेएनपीटी बंदराशी रेल्वेद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी आहे. परिसरात अनेक गोदामे, ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक-टेम्पोसाठी मुबलक पार्किंगची सोय आहे. मध्य रेल्वेने विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भिवंडी स्थानकाचा कायापालट झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news