

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे उघडकीस आले आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळ्या प्रभागात नावे असून गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून मुंबई सोडून वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीला गेलेल्या नागरिकांचीही मतदार यादीत नावे असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे इमारती अस्तित्वात नसतानाही त्या इमारतीच्या नावाने मतदाराचा पत्ता नमूद करण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगरांतील मतदारांमध्ये तब्बल 7 लाख 12 हजार 925 ने वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या 91 लाख 64 हजार 125 वरून 98 लाख 77 हजार 50 पोहोचली आहे. प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मतदारांच्या नावासह अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. यात एकाच घरात व एकाच कुटुंबात राहत असलेल्या सदस्यांची नावे आजूबाजूच्या प्रभागात विखुरली गेली आहेत. उदाहरणार्थ एका घरात पाच सदस्य असतील तर दोन सदस्य एका प्रभागात मतदान करणार व तीन सदस्यांना दुसर्या प्रभागात मतदान करावे लागेल.
मतदार यादीमध्ये वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई सोडून गेलेल्या नागरिकांचीही नावे आहेत. विशेष म्हणजे काही नागरिक ज्या इमारतीत राहत होते, त्या इमारतीही सध्या अस्तित्वात नाहीत. मतदार यादीत मृत नागरिकांची नावेही आहेत. याबाबत नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही या विभागाकडून सांगण्यात आले. प्रभाग निहाय बनवण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये प्रत्येक प्रभागात त्रुटी आहेत. मात्र यादीतील त्रुटीबाबत अवघ्या 405 जणांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. त्यामुळे त्रुटी जैसे थे.. राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागाची मतदार यादी प्रत्यक्ष सर्व्हे केल्यानंतरच दुरुस्त होऊ शकते. पण प्रत्येक प्रभागात जाऊन यादीची दुरुस्ती करणे सध्या तरी शक्य नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. त्यामुळे यादीतील घोळ मुंबई महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीतही राहणार असल्याचे स्पष्ट होते.