मुंबई : चाहूल बाप्पाच्या आगमनाची

मुंबई : चाहूल बाप्पाच्या आगमनाची
Published on
Updated on

मुंबई; गणेश शिंदे :  गणेशोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपल्याने आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला मुंबईकर लागले आहेत. 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी लालबाग, चिंचपोकळी येथील गणेशचित्र शाळेतून मोठ्या गणेशमूर्ती मिरवणूक काढून वाजत-गाजत नेल्या. रविवारी लालबाग, मंगलदास मार्केट, दादरमधील बाजारपेठ खरेदीसाठी गर्दीने फुलल्याचे दिसून आले. मिरवणूक पाहण्यासाठी लालबागच्या रस्त्यावर गणेशभक्तांची अलोट गर्दी होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुबई पोलिसांचा बंदोबस्त होता.

गणेशोत्सव मंडळांनी चिंचपोकळी, लालबाग येथील चित्रशाळेमधून रविवारी सकाळपासून गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली. परेल, कुलाबा, विलेपार्ले, दादर या परिसरातील मंडळानी गणेशमूर्ती नेल्या. यात विलेपार्ले पूर्वेतील मुंबईचा पेशवा, मुंबईचा विघ्नराजा, परळचा राजा या गणेशमूर्तींचा समावेश होता. गणेशमूर्ती, मंडप सजावट साहित्य, डेकोरेशन लाईटींग खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. यंदा गणेशोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे.

विविधरंगी गणेशमूर्तींचे पुष्पहार, सजावटीचे वैविध्यपूर्ण तयार मंडप विक्रीस आहेत. चिंचपोकळी, लालबाग, दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाबाहेरील बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. गोंडा, फुले, माणिक मोती, रुद्राक्ष असे गणेशमूर्तीचे पुष्पहार व लटकन बाजारात आले आहेत. माणिक मोती पुष्पहाराला सर्वाधिक मागणी आहे. लटकन हे 500 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत मिळत आहेत. पुष्पहारांचे दर हे फुटानुसार आहेत. कोरोनानंतर केवळ पुष्पहारांच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. घरगुती गणेशमूर्तीचे मंडप उभारण्यासाठी लागणारे पिलर्स हे 85 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत आहेत. घरगुती गणपती मंडप सजावटीचे दर हे साडेतीन हजार रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. भारतीय व चिनी पद्धतीच्या रोषणाईच्या माळा मंगलदास रोड, लोहार चाळ, झवेरी बाजार, पाठकवाडी, विठ्ठलदास रोड, महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) येथे विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. विद्युत रोषणाईसाठी शंभर बल्बच्या माळांचा दर 450 ते 500 रुपये असा आहे. 7 मीटरच्या चिनी माळा या 70 रुपयांना मिळत आहेत. गणेशमूर्तीच्या चेहर्‍यावर विद्युत रोषणाई पाडण्यासाठी बल्बचे बार खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत. 18 बल्बच्या बारची किंमत 550 रुपये तर, 14 बल्ब्च्या
बारची किंमत 450 रुपये आहे.

अशा आहेत किमती

घरगुती फुलांची मंडप : सजावटीसाठी (चार बाय चार) 2019 मध्ये 2500 रुपये मोजावे लागत होते. यंदा हे दर वाढून 3500 रुपये द्यावे लागत आहेत.

सिंहासन सजावट : (चार बाय चार ) 2019 मध्ये 10 ते 11 हजार रुपयांना मिळत होती. 2022 मध्ये हे दर वाढून 14 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

माणिक मोती पुष्पहार : (5 फुट) 450 रुपयांना मिळत आहे. फुलांचे पुष्पहार 3 फुटाचा दर 250ते 300 रुपये आहे.

शेवटचे दोन दिवस आम्ही मंडप सजावटीची घरपोच सेवा देणार आहोत. ही सेवा फक्त दादरपर्यंत असेल. सार्वजनिक गणेश मंडळांची सजावट आम्ही त्याठिकाणी जाऊन करतो.
-संकेत कदम , मंडप सजावट
विक्रेते, चिंचपोकळी

घरगुती गणेशमूर्ती व सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीला लागणार्‍या सर्व साहित्याची आम्ही विक्री करतो. गणेशमूर्तीचे विविध प्रकारातील
पुष्पहार उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांना परवडेल असे पुष्पहार व लटकनचे दर आहेत.
– चंदन वोरा,
विक्रेते, लालबाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news