

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एसी लोकलच्या विरोधात कळवा, बदलापूर येथील प्रवाशांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत 19 ऑगस्टपासून वाढविलेल्या एसी लोकलच्या 10 फेर्या तात्पुरत्या का होईना रद्द केल्या. उर्वरित 56 फेर्या वेळापत्रकानुसार धावतील असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या 10 फेर्यांवर पूर्वीप्रमाणेच साध्या लोकल चालविण्यात येणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने 19 ऑगस्टपासून सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, बदलापूर दरम्यान एसी लोकलच्या 10 फेर्या वाढवल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकलची दिवसभरातील संख्या 66 झाली. परंतु यापैकी एक-एक एसी लोकल सकाळी ठाणे ते सीएसएमटी आणि सायंकाळी सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान चालविण्यात आल्या. साध्या लोकल बंद करून त्याठिकाणी एसी लोकल चालवल्याने
सामान्य प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. बदलापूर ते ठाण्यातील प्रवाशांना याचा मोठा फटका बसल्याने ठिकठिकाणी आंदोलने
करत प्रवाशी आक्रमक झाले. अखेर उद्या 25 ऑगस्टपासून एसी लोकलच्या फेर्या रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वे प्रशासनावर आली.
मध्य रेल्वेने 19 आगस्टपासून सीएसएमटी ते ठाणे,कल्याण,बदलापूर दरम्यान एसी लोकलच्या 10 फेर्या वाढविल्या. त्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकलची दिवसभरातील संख्या 66 झाली. ठाणे-सीएसएमटी लोकल कळवा कारशेडमधून येत होती. ती एसी झाल्याने
प्रवासी त्यातून प्रवास करु शकत नव्हते. त्यामुळे कळवा स्थानकातील प्रवाशांनी गेल्या चार दिवसापासून आंदोलन केले. प्रवाशांच्या
आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काग्रेसचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी मध्य रेल्वे डीआऱएची भेट घेऊन एसी लोकल संदर्भात रोष व्यक्त केला. एका महिन्यात साध्या लोकल पुर्ववत करण्यास सांगून मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. खा. श्रीकांत शिंदे
यांनीही मरेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेऊन सायंकाळी 5.22 ची एसी लोकल रद्द करण्याची मागणी केली.
बदलापूर : दरम्यान, संध्याकाळी 05:22 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूर येथे सुटणारी नियमित गाडी एसी केल्यामुळे दोन दिवसांपासून प्रवासी बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत होते. रेल्वे शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे संतप्त प्रवासी आहे त्या तिकिटातच या एसी लोकलमध्ये चढले आणि त्यांना टीसीने पकडले. त्यांच्याकडून दंड वसूल केला. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्यात आणखीन ठिणगी पडली. दंड वसूल केलेल्या प्रवाशांनी एसी लोकल बदलापुरात आल्यानंतर स्टेशन मास्तरांना घेराव घालून गोंधळ घातला.