

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धगधगती मशाल हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला आता समता पार्टीने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंना दिलेली मशाल ही आमच्या पक्षचिन्हासारखीच असल्याचा दावा, समता पार्टीने केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेने त्रिशुळ, मशाल आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाला सूचवली होती. त्रिशुळ हे धार्मिक चिन्ह म्हणून तर उगवता सूर्य हे द्रमुक पक्षाचे चिन्ह असल्यामुळे शिवसेनेला देण्यास आयोगाने नकार दिला. धगधगती मशाल हे पूर्वी समता पार्टीचे चिन्ह होते. 2004 साली या पक्षाची मान्यता रद्द झाली म्हणून मशाल चिन्ह आयोगाच्या मुक्त यादीत समाविष्ट करण्यात येत असून, ते आपणास शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे या पक्षाचे चिन्ह म्हणून बहाल करत आहोत, असे आयोगाने उद्धव यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले
आहे. याचा अर्थ आयोगाने मशाल चिन्ह आधी मुक्त यादीत समाविष्ट केले आणि मग ते उद्धव ठाकरेंना
दिले. असे असताना आता समता पार्टीने आयोगाच्या निर्णयाला हरकत घेतली आहे.
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल म्हणाले, मशाल चिन्ह ही समता पार्टीची ओळख आहे. आमच्या पक्षाची मान्यता रद्द झाली असे आयोग सांगतो. तसे असले तरी आम्ही निवडणूका लढवणे थांबवलेले नाही. कधी काळी आमचाही पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. आमच्यासाठी आरक्षित असलेले हे चिन्ह शिवसेनेला देण्याला आमचा आक्षेप आहे. त्यावर आम्ही आयोगाकडे दाद मागणार आहोत. मशाल चिन्ह देण्याचा निर्णय घटनात्मक यंत्रणा असलेल्या निवडणूक आयोगाने घेतलेला असताना त्याविरुद्ध नवा वाद निर्माण करण्यामागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी दिली.