मुंबई : 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानग्रस्तांना भरपाई – मुख्यमंत्री शिंदे

File Photo
File Photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अतिवृष्टीमुळे 65 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला तर नुकसानभरपाई देण्यात येते. मात्र याबरोबरच यापुढे सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात
येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्‍कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, लवकरच मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी आणि संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा(सॅटेलाईट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जुलै 2022 मध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सुधारित दराप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत प्रतिहेक्टरी वाढीव मदत आहे. पूर्वी दोन हेक्टर मर्यादेत मदत केली जायची. आता ती तीन हेक्टर पर्यंत वाढविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला. जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने प्रस्ताव आणला होता. या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news