मुंबई: 16 बंडखोरांना नोटिसा, उद्यापर्यंत उत्तराची मुदत

मुंबई: 16 बंडखोरांना नोटिसा, उद्यापर्यंत उत्तराची मुदत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: पुढारी वृत्तसेवा शिवसेनेशी बंडखोरी करत गुवाहाटी येथे चार दिवस तळ ठोकून असलेल्यांपैकी 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शनिवारी नोटिसा जारी केल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत पक्षादेश मोडल्याप्रकरणी तुमचे लेखी म्हणणे सादर करा, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या कारणावरून निरर्हत) नियम 1986 नुसार आपल्या बचावाचे लेखी म्हणणे सोमवारी, 27 जूनपर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उपाध्यक्ष यांना सादर करावे. आपण योग्य त्या कागदपत्रांसह उपरोक्‍त मुदतीत आपले लेखी अभिप्राय सादर न केल्यासआपल्याला प्रतोद यांच्या विनंती अर्जावर काहीही म्हणायचे नाही, असे समजून पुढील कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले आहे.  ज्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात शिवसेना प्रतोदने विनंती केली होती, त्यांना ई-मेलद्वारे या नोटिसा बजावल्या आल्या आहेत.

त्यामध्ये बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. विधानसभा उपाध्यक्ष यांनी बजावलेल्या नोटिसीवर शिंदे गटानेही सावध पवित्रा घेतला आहे. आजही आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, असा दावा बंडखोर शिवसेना आमदारांच्या गटाचे प्रवक्‍ते आमदार दीपक केसरकर यांनी केला. या नोटिसांनुसार आमच्यावर कारवाई केल्यास याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे केसरकर यांनी सांगितले. सभागृह चालू नसताना असा पक्षादेश (व्हिप) बजावता येत नाही.

व्हिपचा पक्षाच्या बैठकीशी काहीही संबंध नाही. आपले बहुमत संपुष्टात आल्याने या क्लृप्त्या केल्या जात असल्याचे ते म्हणाले. शिंदेंचे नवे ट्विटप्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, मविआचा खेळ ओळखा. मविआ अजगराच्या विळख्यातून शिवसेनेला सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताला समर्पित!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news