महाराष्ट्र-कर्नाटक सीमा खटल्यात आणखी दोन वकील

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा खटल्यात आणखी दोन वकील

मुंबई, बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. हरिष साळवे यांच्याशी दिल्लीत चर्चा करून दाव्याला वेग देण्याचा निर्णय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथे मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या बैठकीत तज्ज्ञ समिती अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सीमाप्रश्नी कामकाजाचा आढावा घेतला.

महिन्याभरात सर्व साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे अंतिम करण्याचा निर्णय बैठकीत झाला. पुढील बैठक 8 जुलैरोजी निश्चित करण्यात आली. या बैठकीपूर्वी प्रतिज्ञापत्रे अंतिम करण्यात यावीत, असे ठरवण्यात आले. याशिवाय नकाशे पूर्ण करणे आणि न्यायालयीन कामकाजासाठी वरिष्ठ वकिलांची नियुक्ती करणे आणि त्यानंतर दिल्ली येथे सर्व वरिष्ठ वकिलांची बैठक घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबत पूर्वतयारी करावी, अशा सूचना अध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्या. बैठकीत प्रारंभी अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबतची वस्तुस्थिती मांडली. सीमाभागातून गेलेले सदस्य अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, दिनेश ओऊळकर, अ‍ॅड. राम आपटे यांनी मते मांडली. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा समितीच्या सदस्य सचिव सुजाता सौनिक, अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड अ‍ॅड. शिवाजी जाधव, अ‍ॅड. संतोष काकडे आदी उपस्थित होते. काही काळ आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.

वय 91, तडफ तीच

महाराष्ट्र सरकारच्या तज्ज्ञ समितीत अ‍ॅड. राम आपटे यांचाही समावेश आहे. सीमालढ्यात सातत्याने कार्यरत राहिलेल्या अ‍ॅड. आपटे यांनी वयाच्या 92 व्या वर्षीही तितक्याच तडफेने मुंबई येथे झालेल्या बैठकीला उपस्थिती लावली. सीमाप्रश्नी त्यांच्या तळमळीबाबत अधिकारी आणि वरिष्ठ वकिलांनी कौतुक केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news