

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाला 50 चा आकडाही गाठता येणार नाही. पुढचा महापौर भाजपचाच असेल. भाजप, शिवसेना, रिपाइं युती 151 जागांवर विजय मिळवेल, असा निर्धार करत मुंबई भाजपने रविवारी पालिका निवडणुकीसाठी मिशन 151 ची घोषणा केली.
मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक मुंबईत पार पडली. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीकेचा भडिमार केला. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह पक्षाचे मुंबईतील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला खोलवर जाऊन काम करायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, लाभार्थ्यांशी संपर्क करणे, 'नौ साल बेमिसाल' या जनसंपर्क अभियानात केंद्र सरकारचे सर्व विषय पोहोचवणे गरजेचे असल्याचे शेलार यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजारची नोटबंदी आणि कर्नाटक निकालावरून भाजपवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शेलार यांनी राज यांच्यावर पलटवार केला. आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही. पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मूलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा शेलार यांनी राज ठाकरे यांना दिला. टीका करणार्यांचे स्वागत तर आहेच; पण कधी कधी असे वाटते, आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी राज यांना लगावला.