‘ब्लॅक स्पॉट’ने घेतला सायरस मिस्त्रींचा बळी?

‘ब्लॅक स्पॉट’ने घेतला सायरस मिस्त्रींचा बळी?
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर ज्या ठिकाणी अपघात तो भाग ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत राज्य सरकार आणि अन्य एका संस्थेकडून दोन अहवाल मागितले आहेत. त्यानंतर हा ब्लॅक स्पॉटचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील अपघाताच्या घटनास्थळावरील प्राथमिक अहवालावरून असे दिसून येते की, अपघातामागील कारणांमध्ये कार चालकाला आलेला थकवा आणि सात एअरबॅग्जने सुसज्ज असलेली एसयूव्ही कार चालवत असताना असलेला भरधाव वेग यांचा समावेश आहे. तसेच, अपघाताचे ठिकाण हे सध्या ब्लॅक स्पॉटमध्ये समाविष्टसुद्धा करण्यात आलेले नाही. याप्रकरणी तपास करत असलेल्या यंत्रणांनी हा भाग अपघात प्रवण क्षेत्र आहे असे जर सुचविले गेले, तरच हा ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचे एका अधिकार्‍याने यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, ब्लॅक स्पॉट हे रस्त्यावरील एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे जाहीर केले जातात आणि त्यानंतर येथे सुधारणा केली जाते. 2016 ते 2018 या काळातील आकडेवारीच्या आधारे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर एकूण 5 हजार 803 ब्लॅक स्पॉट्स जाहीर करण्यात आले आहेत. यातील 25 ब्लॅक स्पॉट्स हे महाराष्ट्रात आहेत. यातील दोन ब्लॅक स्पॉट हे सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झालेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आहेत. मिस्त्री यांच्या कारला जेथे तीन लेन या दोन लेनमध्ये येतात त्या ठिकाणी अपघात झाला आहे. तेथे अजून ब्लॅक स्पॉट जाहीर करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज फोरमॅटिक एसयूव्हीचा वेग ताशी सुमारे 134 कि.मी. होता, असे कारच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून दिसते. रविवारी दुपारी 2.21 वाजता कारने चारोटी चेकपोस्ट ओलांडला होता. अपघाताचे ठिकाण येथून 20 कि.मी. अंतरावर आहे. मर्सिडिज कारने हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण केले. अधिक तपास करण्यासाठी सोमवारी घटनास्थळावरील सर्व पुरावे अपघाताचे रिक्रिएशन करण्यासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत नेण्यात आले आहेत.

मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारमध्ये चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सात एअरबॅग्स होत्या. या अपघातात समोरील सीटवरील दोघेही बचावले. तर, मागच्या सीटवर बसलेले मिस्त्री आणि सहप्रवासी यांचा मृत्यू झाला. मागच्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अपघाताच्या प्राथमिक तपासात सीट बेल्ट न घातल्याने कार अचानक थांबल्यानंतर प्रवासी समोरच्या दिशेने फेकले गेल्याचे दिसून येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news