‘बाबरी’वरून ठिणगी! मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे

file photo
file photo
Published on
Updated on

मुंबई;  पुढारी डेस्क : 'बाबरी पाडली त्यावेळी तेथे ना बाळासाहेब ठाकरे होते, ना शिवसैनिक,' या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा किंवा चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत तोफ डागली आहे.

बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा दावा केल्याच्या दुसर्‍याच दिवशी ठिणगी पडली. मनसेनेही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे यांचा व्हिडीओ जारी केला.

बाबरी पडली तेव्हा भाजपचे उंदीर बिळात लपून बसले होते : उद्धव ठाकरे

बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बरेच उंदीर आता बाहेर पडू लागले आहेत. पण संतापजनक गोष्ट ही आहे की, ज्यावेळेला ही बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हते, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर तातडीची पत्रकार परिषद घेतली. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतील खंदकातून बाहेर पडले. पण, बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली, त्यावेळी यातले एकही बाहेर यायला तयार नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली. तरीही भाजपकडून मुद्दाम अशी वक्तव्ये केली जात असल्याचे सांगत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारसेवा आंदोलनातील सहभागावरून टोले लगावले. बाबरी पाडल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी तेव्हा हे काम शिवसेनेचे असल्याची विधाने केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या बाळासाहेबांनी अशी विधाने केली.'हे कसले नपुंसक नेतृत्व' अशी हेटाळणी केल्याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

चंद्रकांत पाटील यांनी अशी विधाने करण्यापूर्वी एकदा लालकृष्ण आडवाणींचीच मुलाखत कायला हवी, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. नाही तर आमच्यातले जे मिंधे तिकडे गेले त्यांनी स्वत: पदाचा राजीनामा दिला पाहिजे. बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान केवळ सत्तेसाठी सहन करता येणार नाही. चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे भाजपची चाल आहे. हळूहळू त्यांना बाळसाहेबांचे महत्त्व कमी करायचे आहे. ज्यांच्याकडे कर्तृत्व नसते त्यांना चोरीची गरज लागते, असे ठाकरे म्हणाले. तसेच मनावर ओझं ठेवून जे दगड बसवलेला आहे तो आता जड व्हायला लागलाय. तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती भाजपच्या येथील नेतृत्वाची झाली आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे : बावनकुळे

राम जन्मभूमीचे आंदोलन हा एक मोठा विचार होता. या आंदोलनाला बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हते, असे म्हणणे चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे, पक्षाची नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे स्पष्ट केले.

बाळासाहेबांबाबत नितांत आदर : चंद्रकांत पाटील

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच नितांत श्रद्धा व आदर आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलून माझी भूमिका समजावून सांगणार आहे,' असा खुलासा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, बाळासाहेबांमुळे अनेक हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली. मुंबई जेव्हा दंगली व्हायच्या, तेव्हा मुंबईतला हिंदू त्यांच्यामुळे जिवंत राहिला. बाबरी ढाचा पाडण्याचे आंदोलन 1983 पासून विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात सुरू झाले. प्रत्यक्ष ढाचा पडताना, सगळे हिंदू होते. हे शिवसेनेचे, ते अमुक पक्षाचे असा भेद नव्हताच. आनंद दिघे यांनी अयोध्येत मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा श्रेय घेतले होते. चुकूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही.

चंद्रकांत पाटलांचा रोख माजी मुख्यमंत्र्यांकडे : मुख्यमंत्री

पारनेर : बाबरी मशीदसंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'त्यांचा' रोख माजी मुख्यमंत्र्यांकडे असल्याची भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. पाटील यांचा रोख आताच्या माजी मुख्यमंत्र्याकडे (उद्धव ठाकरे) आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा हे कोठे होते? असे पाटील यांना म्हणायचे असल्याचे उत्तर शिंदे यांनी दिले. लखनौच्या कोर्टात केस सुरू असताना बाळासाहेब तेथील कोर्टात गेले होते. तेव्हा बाळासाहेबांनी घेतलेली जाहीर परखड भूमिका सर्वांना माहिती आहे. मुंबई दंगलीवेळी बाळासाहेबांनीच रक्षण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news