मुंबई : पालिकेला कंत्राटदार मिळेनात; मुलुंडच्या पार्किंग निविदांना दुसर्‍यांदाही प्रतिसाद नाही

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुलुंड पश्चिम येथे बांधण्यात आलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळासाठी कंत्राटदार पुढे येईनासे झाले आहेत. कंत्राट मूल्य कमी करूनही दुसर्‍यांदा काढण्यात आलेल्या निविदेलाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे पार्किंग आता चालवणार कोण? असा प्रश्न पालिकेला पडला आहे.

मुलुंड पश्चिम, लालबहादूर शास्त्री मार्ग, निर्मल लाइफस्टाईल मॉलपासून काही अंतरावर पालिकेला विकास नियंत्रण नियमावली 33(24) अंतर्गत अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात खासगी बिल्डरकडून आजुबाजूला दोन सार्वजनिक वाहनतळ बांधून मिळाले आहेत. दोन मजली इमारत आणि तळमजला अशी ही दोन वाहनतळे आहेत. दोन्हीकडे सुमारे 350 चारचाकी वाहने उभी होऊ शकतील इतकी जागा आहे. सहा महिन्यांपूर्वी ही पार्किंग पालिकेच्या ताब्यात आली आहेत. ही पार्किंग चालवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. ही वाहनतळ कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी पहिल्यांदा एप्रिल दरम्यान निविदा मागवल्या. त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंत्राट मूल्य कमी करून दुसर्‍यांदा निविदा मागवल्या.

या निविदेची मुदत 4 जुलैला संपली, मात्र कंत्राटदारांनी निविदा भरलेल्या नाहीत. पालिकेला या पार्किंगमधून अपेक्षित असलेले उत्पन्न देण्यास कंत्राटदारांनी असमर्थता दर्शवली आहे. वाहनतळ चालवण्यासाठी येणारा खर्च आणि पालिकेला द्यावयाचे लाखो रुपयांचे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने निविदांमध्ये भाग घेत नसल्याचे कंत्राटदारांनी पालिकेला कळवले आहे. मुलुंड पश्चिम परिसरात पालिकेची दोन वाहनतळे असून तिथे चांगल्या सुविधा नसतानाही ते चालत आहेत. त्यातून पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे एलबीएस रोडवरील नवीन वाहनतळात कंत्राटदार कंत्राट मूल्य कमी करण्यासाठी पालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news