पारंपरिक वाणिज्य शाखा, सेल्फ फायनान्सकडे कल

पारंपरिक वाणिज्य शाखा, सेल्फ फायनान्सकडे कल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पदवी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत शनिवारी संपली. बुधवारी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यंदा तब्बल 2 लाख 41 हजार 921 एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 6 लाख 45 हजार 228 इतके अर्ज सादर केले आहेत.

अर्ज नोंदणीत वाणिज्य शाखेच्या पारंपरिक शाखेबरोबर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना अधिक मागणी असल्याचे चित्र आहे.
बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु झाले. सीबीएसई आणि आयएससी मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे यंदा ही प्रवेश प्रक्रिया केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचीच होत आहे. यामुळे स्पर्धा कमी असेल असा विचार करून बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा इन हाऊस कोट्यामध्ये प्रवेश न घेता सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करणे पसंत केले आहे.

विविध विद्याशाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यानी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 3 लाख 84 हजार 832, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 1 लाख 83 हजार 513 , मानव्यविद्याशाखा 74 हजार 421 आणि आंतरविद्याशाखेसाठी 2 हजार 462 असे एकूण 6 लाख 45 हजार 228 एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत.

ज्या महाविद्यालयात सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे पदवी प्रवेशात विद्यार्थ्यांचा कल दिसत आहे. बीएमएस, बीएफएम, बीएएफ, बीएस्सी आयटी या सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना अधिक मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी बहुतांश महाविद्यालयांनी अशा प्रकारचे अभ्यासक्रम आणले आहेत.  सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी उच्च शिक्षणही घेऊ शकतात. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्राधान्य असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

वाणिज्य पारंपारिक शाखेला यंदा मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. याबरोबर बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंश) बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) बीएमएस या अभ्यासक्रमांना अधिक अर्ज आले आहेत. दरवर्षी सीबीएसई आणि आयएससी मंडळाचे विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयातील जागांवर प्रवेश निश्चित करत असत. यंदा हे चित्र वेगळे आहे. यंदा पदवी प्रवेश प्रक्रियेत अधिक चुरस राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्येच पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news