निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्या; शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्या; शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर ठोकलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे व ठाकरे गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबतची सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले होते. आयोगाने सुरू केलेल्या या कार्यवाहीला स्थगिती दिली जावी, अशी याचिका शिवसेनेकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

खरी शिवसेना कोणाची, यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचे सांगून काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. आयोगाने गेल्या आठवड्यात यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दोन्ही गटांना दिले होते. निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या या कार्यवाहीला आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक आयोग शिंदे गटाच्या मागणीवर कार्यवाही करू शकत नाही, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे.
आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी येत्या 8 ऑगस्टपर्यंतची वेळ दिलेली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खरी शिवसेना कोणाची, याबाबतचा कौल आयोग देणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटांकडून शिवसेना पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा ठोकण्यात आलेला आहे. सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी येत्या 1 तारखेला होणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news