

नवी मुंबई; पुढारी वार्ताहर : नवी मुंबई शहरात कोरोना महामारीच्या कालावधीत गेल्या दोन वर्षांमध्ये गणेश विसर्जनासाठी भाविकांनी कृत्रिम तलावांना सर्वाधिक पसंती दिल्यामुळे यंदाही ही संकल्पना कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गणरायाच्या विर्सजनासाठी शहरात यंदा 134 कृत्रिम तलाव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 पांरपारिक विर्सजन घाटांवरही गणरायाचे विर्सजन होणार आहे. 157 ठिकाणी गणरायाचे विर्सजन होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तिंची संख्या 50 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले आहे. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरात कृत्रिम तलावांचे नियोजन केले होते. जास्तीत जास्त गणेशमूर्तींचे या ठिकाणी विसजर्न करण्यात आले होते. आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असून शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींनाही परवानगी दिली आहे. त्यामुळे या मूर्तींची संख्या यंदा वाढणार आहे. या मूर्ती सार्वजनिक विसर्जन तलावांत विसर्जित केल्या तर पर्यावरणचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेप्रशासनाने मूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक तलाव व कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. शहरात पारंपरिक 22 विसर्जन तलाव आहेत. तसेच 134 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांत फक्त फ्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत.
गणेश विर्सजन निर्विघ्न पार पडावे यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील सर्वच विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हिच यंत्रणा कृत्रिम तलावांवरही कार्यान्वित राहणार आहे. शहारातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.