

मुंबई; वृत्तसंस्था : धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या मागणीत 40 टक्के (वार्षिक पातळीवर) वाढ झाली असून, सणासुदीच्या निमित्ताने एकंदर मागणीत सोन्याचा वाटा 70 टक्के असल्याचे जस्ट डायल ग्राहक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुसर्या श्रेणीतील शहरांमध्ये याबाबतची मागणी वाढली आहे. पहिल्या व दुसर्या श्रेणीतील शहरांमध्ये असलेल्या मागणीत वाढ 44 टक्के आहे. पहिल्या श्रेणीतील शहरांत सोन्या-चांदीच्या सर्चमध्ये 34 टक्के वाढ झाली आहे. किमती स्थिर होत असतानाच सोन्याला सर्वाधिक मागणी असून, त्यात 34 टक्के (वार्षिक) वाढ, चांदीमध्ये 140 टक्के, प्लॅटिनममध्ये 82 टक्के वाढ झाली आहे, तर हिर्यांना असलेली मागणी स्थिर आहे.
गेल्यावर्षी धनत्रयोदशीमध्ये सोन्याच्या मागणीत चांदीच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली होती, तर यंदा ही मागणी चौपट झाली आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे देशभरातील रिटेलर्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांमधील हा कल निदर्शनास आणताना जस्ट डायलचे सीएमओ प्रसून कुमार म्हणाले, किमती कमी झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
सोन्याच्या दागिन्यांना असलेल्या मागणीवर पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळूर यांचे वर्चस्व आहे. सोन्याच्या नाण्यांना असलेल्या मागणीत दिल्ली 41 टक्के सर्चसह आघाडीवर आहे आणि मुंबईत सोन्याच्या बार्सना 34 टक्के मागणी आहे.