देशभरातील रेल्वे अपघातात 35 टक्के वाढ

देशभरातील रेल्वे अपघातात 35 टक्के वाढ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या दोन प्रवासी आणि एका मालगाडीच्या अपघातात शेकडो प्रवाशांचा जीव गेला. या अपघातानंतर जगातील सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक करणार्‍या भारतीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्ती कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्ष 2022-23 मध्ये 48 रेल्वे अपघातांची नोंद आहे. यात 36 अपघात गाड्या रुळांवरून घसरल्याने, 6 टक्कर आणि 4 आगीच्या घटनांचा समावेश आहे. 2021-22 मध्ये 34 रेल्वे अपघात झाले होते. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल 2.40 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. सुरक्षेच्या उपायांसाठी अर्थसंकल्पात लक्षणीय तरतूद असूनही, रेल्वे अपघात 2022-23 या आर्थिक वर्षात 35 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामुळे भारतीय रेल्वेमधील सुरक्षेच्या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 2021-22 मध्ये झालेल्या 34 अपघातांपैकी 20 अपघात रेल्वे कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे, 4 अपघात रेल्वेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीमुळे आणि 4 अपघात उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे झाले होते.

सुरक्षा तज्ज्ञ आणि रेल्वे अधिकारी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा पद्धतींचे पुनरावलोकन करणे, कर्मचारी प्रशिक्षण आणि जागरूकता वाढवणे, प्रगत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे, देखभाल आणि तपासणी प्रक्रियेस बळकट करणे आणि भारतीय रेल्वेमध्ये रिक्त पदे भरणे या महत्त्वावर भर देतात.

रुळावरून घसल्याने अपघात

रेल्वे सुरक्षा अहवाल 2019-20 नुसार 70 टक्के अपघात गाड्या रुळांवरून घसरल्याने होतात. पूर्वी हे प्रमाण 68 टक्के होते. रेल्वेला आग लागल्याने 14 आणि धडक झाल्याने 8 टक्के अपघात होतात. या अहवालासाठी डबे घसरण्याच्या 40 घटनांचा अभ्यास करण्यात आला. त्यात 33 प्रवासी ट्रेन आणि सात मालगाड्यांचा समावेश होता. त्यापैकी 17 वेळा डबे ट्रॅकमध्ये असलेल्या त्रुटींमुळे घसरले. त्यात रेल्वे रुळ तुटणे किंवा कमकुवत असण्याचा समावेश आहे. ट्रेनमध्ये बिघाड असल्याने रुळावरून घसरण्याच्या नऊ घटना घडल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news