डेटिंग अ‍ॅपच्या नावाने तरुणाकडून खंडणीवसुली

डेटिंग अ‍ॅपच्या नावाने तरुणाकडून खंडणीवसुली
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : डेटिंग अ‍ॅपच्या नावाने अंधेरी येथे बोलावून एका 24 वर्षांच्या तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी वसुली करणार्‍या एका मुख्य आरोपीसह दोघांना अंधेरी येथून ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मोहीतकुमार हनुमानप्रसाद टाक ऊर्फ प्रशांत ऊर्फ डान्सर ऊर्फ बेबो आणि वजहुल कमर खान अशी या दोघांची नावे आहेत. अपहरण आणि खंडणीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. महिलांशी डेटिंग आणि शारीरिक संबंध ठेवल्यास पैशांचे आमिष दाखवून ही टोळी खंडणी वसुली करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

24 वर्षांचा तक्रारदार तरुण माटुंगा लेबर कॅम्प परिसरात राहत असून तो इमिटेशन ज्वेलरी विक्रीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या एका मित्राच्या सांगण्यावरुन लॉकनटो नावाचे डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड केले होते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन अंधेरी येथे बोलाविले होते. महिलांशी डेटिंग आणि शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला चांगले पैसे मिळतील, असे सांगण्यात आले होते. बुधवारी 10 ऑगस्टला तो अंधेरीतील लिंक रोड, लोटस पेट्रोपंपाजवळील इन्फिनिटी मॉलजवळ आला होता. यावेळी तिथे एक कार आली आणि कारमधील दोघांनी त्याला कारमध्ये बसण्यास सांगितले.

ओशिवरा लिंक रोड फिरवून या दोघांनी एका निर्जनस्थळी आणून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. मात्र आपल्याकडे पाच लाख रुपये नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्याच्याकडील दोन हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला फोन पेद्वारे पाच हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. सात हजार रुपये घेतल्यानंतर या दोघांनी त्याला सोडून दिले. डेटिंग अ‍ॅपच्या नावाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.

या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे, पोलीस निरीक्षक सचिन जाधवर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या प्रकरणी तपास करून एपीआय आनंद नागराळ, पोलीस अंमलदार शैलेश शिंदे, सिराज मुजावर, उमेश सोयंके, अजीत चोपडे, मनिष सकपाळ, नवनाथ गीते यांनी मोहीतकुमार टाक आणि वजहुल खान या दोघांना अटक केली.

मोहीमकुमार हा राजस्थानच्या जयपूरचा रहिवासी असून तो सध्या जोगेश्वरीतील लष्करिया टॉवर अपार्टमेंटमध्ये राहतो. या कटातील तोच मुख्य सूत्रधार असून त्याच्याविरुद्ध जयपूर येथे अशाच प्रकारे काही खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. वजहुल हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तो चालक म्हणून काम करतो. मुंबई दर्शन करायचे आहे, असे सांगून त्याने या गुन्ह्यांत त्याच्या कारचा वापर केला होता. या दोघांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारे काही गुन्हे केले आहे का, गुन्हे करणारी ही एक टोळी आहे का याचा पोलीस तपास करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news