जन्मतः मूकबधिर मुलाला मिळणार वाणी; कॉक्लीअर इम्प्लान्टची यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मतः मूकबधिर मुलाला मिळणार वाणी; कॉक्लीअर इम्प्लान्टची यशस्वी शस्त्रक्रिया
Published on
Updated on

मुंबई; प्रकाश साबळे : जन्मत: मूक बधिर असलेल्या वेदांत गांगे या 4 वर्षीय मुलावर कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात 'कॉक्लीअर इम्प्लान्ट' ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे तीन महिन्यानंतर या मुलाला बोलता येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कॉक्लीअर एक लघु इलेक्ट्रॉनिक उपकरण असून ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता मोठ्या प्रमाणात दूर होण्यासाठी मदत होते. महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. राजेश यादव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कॉक्लीअर इम्प्लान्टचे महत्त्व जाणून ही शस्त्रक्रिया ह्या रुग्णालयात सुरू करण्याबाबत विशेष प्रयत्न केले आहेत. वेदांत गांगे हा मुंबईतील सर्वसामान्य घरातील आहे. त्याचे वडिल फळविक्रीचा व्यवसाय करतात. तो जन्मत: मूकबधीर असल्याचे एक वर्षापूर्वी त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आले. मुलाच्या उपचाराकरीता आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले. मात्र गरीबीमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात मुलाला नेले. येथील डॉक्टरांनी त्यांना कॉक्लीअर इम्प्लान्टबद्दल माहिती दिली. या शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याने रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाउंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांच्या आर्थिक मदतीने रुग्णालयात अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया 8 जुलै रोजी यशस्वीरित्या पार पडली. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. राजेश यादव यांच्या प्रयत्नाने कान-नाक-घसा तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मिलिंद किर्तने यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. संगमलाल पाल, डॉ. मृण्मयी यांनी सहाय्य केले. याप्रसंगी मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड आणि डॉ. ललित सेठ सुध्दा उपस्थित होते. या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याचा 30 डॉक्टरांनी लाभ घेतला.

बालकाची प्रकृती स्थिर असून त्याच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. गरीब कुटुंबातील गरजू रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया नियमित स्वरुपात करण्याची व त्याकरिता ई.एन.टी. सर्जन, स्पीच थेरपिस्ट व काऊंसिलर यांची सर्वसमावेशक यंत्रणा राबिवण्यात येणार असल्याचे डॉ. राजेश यादव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news