

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान खारघर येथे 14 श्री सेवकांच्या मृत्यूचे गुरुवारी विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला मुदतवाढ न देता समितीचा 15 दिवसांत अहवाल सभागृहासमोर ठेवा, असे सांगत या प्रश्नाला सांस्कृतिकमंत्र्यांनी उत्तर देणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या समर्थन करण्यासारखे आहे. त्यामुळे खारघर दुर्घटनेसंदर्भात गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणीही पाटील यांनी यावेळी केली.
नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात उष्माघाताने 14 नागरिकांच्या झालेल्या मृत्यूंसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न मांडण्यात आला होता. या दुर्घटनेबाबत कार्यक्रम नियोजक कंपनीवर आणि त्याच्या सबकंपनीवर गुन्हा दाखल केला का, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार का, असे सवाल ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केले; तर खारघरमधील दुर्दैवी प्रसंगासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याच मंत्र्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगणे आणि त्यांनी अप्रत्यक्षरीत्या त्याचे समर्थन करणे, असा हा प्रकार सभागृहात दिसतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले.