एसी लोकलसाठी एमआरव्हीसीचा सर्व्हे

एसी लोकलसाठी एमआरव्हीसीचा सर्व्हे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल चालविण्याबाबत प्रवासी आणि काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने 10 एसी लोकलच्या फेर्‍या बंद केल्या आहेत. तर दुसरीकडे भविष्यात उपनगरीय रेल्वे मार्गावर 238 एसी लोकल येणार आहेत. या लोकल खरेदी करण्यापूर्वी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.

सध्या मध्य रेल्वेवर 56 तर पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 48 फेर्‍या चालविण्यात येतात. एसी लोकलचे तिकिट दर कमी केल्यापासून काहीशी गर्दी वाढली असली तरी साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालविण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. कळवा, बदलापूर येथील प्रवाशांनी एसी लोकलला कडाडून विरोध केल्याने मध्य रेल्वेने एसी लोकलच्या 10 फेर्‍या रद्द केल्या आहेत. एमयुटीपी तीन अंतर्गत 191 तर एमयुटीपी तीन ए मध्ये 47 अशा एकूण 238 एसी लोकल उपनगरीय रेल्वे मार्गावर येणार आहेत. प्रवासी आताच एसी लोकलला विरोध करीत असल्याने एसी लोकलची खरेदी करण्यापूर्वी सर्व्हे घेण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यांना एसी लोकल कशी हवी, तिकिट-पासाचे दर कसे हवे असे अनेक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. हा सर्व्हे करण्यासाठी एमआरव्हीसी एका खासगी सल्लागार कंपनीची नियुक्ती करणार आहे. त्याकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. नियुक्ती केल्यानंतर संबंधित कंपनीने सहा महिन्यांत एमआरव्हीसीला अहवाल सादर करायचा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत सल्लागार कंपनीची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे.

लोकल रद्द करून एसी लोकल, प्रवाशांचे हाल सकाळी 9.03 वा. ठाणे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिमी लोकल रद्द करण्यात आली आहे. हीच लोकल आता एसी मध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. ती ठाणेकर कष्टकर्‍यांची आवडती लोकल होती. 9.03 ची लोकल ही बरोबर 10.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचायची. ती का रद्द केली? कोणासाठी रद्द केली? काहीच कळायला मार्ग नाही. ही लोकल पूर्ववत करा अशी ठाणेकरांची मागणी आहे. प्रकरण हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news