मुंबई : एलआयसी कंपनीने एजंट्ससाठी एक नवी सुविधा आत्मनिर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे. त्यातून कंपनीच्या बिझनेससाठी कंपनीने एक नवा आयाम विकसित केला आहे. या मोबाईल अॅपचे अनावरण एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर मुकेशकुमार गुप्ता, राजकुमार, सिद्धार्थ मोहंती, कु. मिनी आईप आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पेपरलेस केवायसी प्रक्रियेंतर्गत आधार कार्डनुसार ई-ऑथेंटिफिकेशनसाठी हे अॅप लाभदायी आहे. त्यातून एलआयसीची पॉलिसी मिळण्याची प्रक्रिया एजंट किंवा मध्यस्थाच्या सहाय्याने पूर्णतः पेपरलेस आणि जलद होणार आहे. यावेळी ई-ट्रेनिंग व्हिडीओच्या माध्यमातून एजंट्सना या अॅपच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आली. अगदी अॅपच्या प्रक्रियेपासून ते पॉलिसी काढण्यापर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. या अॅपमुळे कंपनीच्या देशभरातील मार्केटिंग टीम आणि एजंट्समध्ये उत्साह संचारला आहे.
यावेळी एम. आर. कुमार म्हणाले की, हा कंपनीसाठी मोठा दिवस आहे. या अॅपच्या निमित्ताने कंपनीने मोठे पाऊल टाकले आहे. भविष्यात अनेक बदल होणार असले, तरी विम्याची गरज कायम राहील आणि विमा क्षेत्रात चांगली सेवा देण्यात एलआयसी आघाडीवर आहे. आयटी टीम आणि हे अॅप विकसित करणार्या न्यू बिझनेस डीपार्टमेंट्सचेही त्यांनी आभार मानले. यावेळी मुंबई विभागातील कंपनीचे टॉप फ्लायर एजंट मेरील बाप्टिस्टा यांनी कुमार यांच्या उपस्थितीत अॅपद्वारे एक पॉलिसी उघडून प्रक्रिया पूर्ण केली.