उद्धव ठाकरे, राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे

उद्धव ठाकरे, राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेच्या वतीने कोव्हिड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटातील घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 15 ठिकाणांवर छापेमारी केली. यात मुंबई महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेना सचिव सुरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांचे घर आणि कार्यालयांचा समावेश आहे.

ईडीने या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज, उपकरणे ताब्यात घेत त्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळा प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी ईडीने संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 15 ठिकाणांवर छापेमारी केली.

कोरोनाकाळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून कोव्हिड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानेच सुजित पाटकरांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून ईडीच्या पथकांनी बुधवारी छापेमारी सुरू केली. मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कोव्हिड मशिनरी उभारण्यास मदत करणारे पुरवठादार आणि अन्य संबंधितांच्या ठिकाणांची झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणासंदर्भात ईडीने चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.

ईडीकडून सुरू असलेल्या छापेमारीमध्ये शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांच्या चेंबूरमधील के. के. ग्रँड या इमारतीत अकराव्या मजल्यावरील घरी छापे टाकण्यात आले. पाच अधिकार्‍यांचे पथक चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेण्यासोबतच त्यांच्याकडे चौकशी करत आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई महापालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा, राज्यसभा अशा विविध निवडणुकांमागे पडद्यामागची गणिते सुरज चव्हाण यांच्या हाती असतात. चव्हाण यांच्या घरावरील छापेमारीची माहिती मिळताच शिवसैनिक त्यांच्या इमारतीजवळ एकत्र आले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर येथे स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यापूर्वी ठाणे महापालिका आयुक्त होते आणि कोव्हिड काळात ते मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. त्यांच्या घरीही ईडीने छापेमारी करून घरातील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज यांची तपासणी सुरू केली आहे. तर सुजित पाटकर यांच्या घरातील छापेमारी दरम्यान ईडीला एक कागद सापडला असून त्यात कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोव्हिड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी पालिकेसोबत करार करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा ईडीचे अधिकारी पाटकर यांच्या घर आणि कार्यालयांची झडती घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news