इतिहासकाराने कधीही सत्याची कास सोडू नये : डॉ. जयसिंगराव पवार

इतिहासकाराने कधीही सत्याची कास सोडू नये : डॉ. जयसिंगराव पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  इतिहासाचे पुनर्लेखन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, इतिहासकाराने कधीही सत्याची कास सोडू नये. सत्याला धरून लिहिले तर ते टिकते. मनामध्ये वाईट धरून लिहिले तर तो विकृत होतो, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केले.

मराठा मंदिर साहित्य शाखेतर्फे आयोजित नवोदित साहित्यिकांच्या प्रथम निर्मितीला पुरस्कार सोहळ्यादरम्यान डॉ. जयसिंगराव पवार यांचा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. पवार यांनी इतिहासकारांबाबत परखड भाष्य केले.
इतिहासामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. मात्र, उपेक्षितांचे चरित्र लिहिण्यावर मी अधिक भर दिला. प्रत्येक राजा महान होता. मात्र, त्यांच्याकडे अनेक निष्ठावंतही होते. त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. जीव धोक्यात घालून राजा आणि राज्य अबाधित राखले. इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन केले जाते. आम्ही पुनर्लेखन करणारे इतिहासकार आहोत. मी महाराणी ताराबाई, संभाजी महाराज, राजाराम महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात ताराबाई यांचे चरित्र सर्वात आवडते असल्याचे डॉ. पवार म्हणाले.

यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते, हे सर्व जगाला कसे पटवून दिले, हे सविस्तरपणे सांगितले. दादोजी कोंडदेव हे निष्णात कारभारी होते. मात्र, शिवाजी महाराजांना घडवण्यात त्यांचे काहीही योगदान नाही. शहाजी महाराज आणि जिजाऊ यांनी त्यांना घडवले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून मुले आणि विद्यार्थी हे जिजाऊंचे नाव घेतात, हे पुनर्लेखन आहे. इतिहासाकडे दुर्लक्ष केले तर भविष्य अंध:कारमय असेल. इतिहासातून आपण शिकण्याची आणि बोध घेण्याची गरज आहे, असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमाला मराठा मंदिरचे अध्यक्ष शशिकांत पवार तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा कर्मवीर आणि शाहू महाराजांचा सत्कार

सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पवार यांनी, हा माझा सत्कार नसून कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार आहे, असे सांगितले. आई-वडिलांनी जन्म दिला आणि घडवले तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि शाहू महाराज माझे आदर्श आहेत, असे डॉ. पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news