

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आपल्या न्याय हक्कांसाठी सातत्याने आंदोलने करून सरकारला जागे करण्याचे काम आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व सुरक्षारक्षक हे घटक करतात. गेल्या अडीच वर्षांत त्यांचे प्रश्न सोडवण्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कमी पडले अशा भावना व्यक्त होत आहेत. परंतु, आता राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने रखडलेले प्रश्न सोडवावे,अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली आहे.
महाविकास आघाडीतील रखडलेले प्रश्न सोडवण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व सुरक्षारक्षक हा घटक नाराज आहे अडीच वर्षांच्या काळात या घटकाला काही मिळालेले नाही. याचा विचार करुन प्राधान्याने; त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील.
याबाबबत मुंबई महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड.प्रकाश देवदास म्हणाले, गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिका आरोग्यसेविकांच्या मानधनात मासिक तीन हजार रुपये वाढ व्यतिरिक्त कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही. 2015 पासून किमान वेतन थकबाकीसह द्यावे, 2011 पासून भविष्य निर्वाह निधी (पी.एफ) व पेन्शनचा फायदा मिळावा या प्रमुख मागण्या आहेत.सध्या आरोग्यसेविकांना 11 हजार रुपये मासिक मानधन आहे. किमान वेतन लागू झाले तर सुमारे 16 हजार रुपये मिळतील. याप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊ, असे ते म्हणाले.