आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप दिवे याच्यासमोर आर्थिक चणचण

आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप दिवे याच्यासमोर आर्थिक चणचण

मुंबई : सुनील सकपाळ :  ऑक्टोबरमध्ये मलेशियात होणार्‍या 8 व्या जागतिक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप दिवे याच्यासमोर आर्थिक आव्हानाचा डोंगर आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला तरी मलेशिया वारीसाठी काही लाखांचा खर्च असल्याने नामांकित संस्था तसेच कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास संदीपचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
संदीप एअर इंडियामध्ये हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मात्र, कोरोना साथीमध्ये अन्य काही कर्मचार्‍यांप्रमाणेच त्यालाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने संदीपने खेळाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र, काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास संदीपने व्यक्त केला आहे. जागतिक कॅरम स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित करण्यादृष्टीने आवश्यक 70 हजार रुपये खर्च होता. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने 35 हजार आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेने 15 हजार रुपये देत संदीपला मोठी आर्थिक मदत केली.

संदीपची व्यावसायिक कॅरममधील कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची आहे. या कालावधीत त्याने राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली असून त्याचे चौथे मानांकन आहे. जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे संदीपचेे स्वप्न होते. त्याची स्वप्नपूर्ती दृष्टिक्षेपात आहे. 8 वी जागतिक अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान मलेशियात होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये कॅरमचा समावेश नसल्याने राज्यातील गुणवान खेळाडूंना राज्याकडून मिळणार्‍या सवलतीस मुकावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र कॅरम खेळ व खेळाडूंची सर्वतोपरी काळजी घेत कॅरम खेळाला चांगली दिशा दिली आहे. परंतु, सरकारने कॅरमपटूंच्या जागतिक योगदानाची दखल घेत त्यांना सवलतींचा मार्ग खुला करावा, अशी मागणी कॅरम संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news