मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता मुलगा ऋषिकेश आणि पत्नी आरती यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.
आरती यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा इडीने जबाब नोंदवल्यानंतर देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, वसुलीचे पैसे सचिन वाझे याला देण्यात आल्याचा जबाब बारमालकांनी 'ईडी'कडे नोंदविला आहे. बारमालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असे सचिन वाझे सांगत होता. नंबर वन म्हणजे नक्की कोण? याचा खुलासा 'ईडी'च्या अधिकार्यांना होत नव्हता. देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी माहिती दिली.
आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या आणि आहेत. त्यात अनेक विसंगती आहेत. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेत असल्याचे अॅड. घुमरे म्हणाले.
ईडीने देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख यांना समन्स दिले. आरती यांना बुधवारी समन्स दिले आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहेत. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावा अॅड. घुमरे यांनी केला आहे.
वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्या. चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केले आहे. त्यात तो 4 कोटी 70 लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचे सांगत वाझे सांगत असल्याचेही अॅड. घुमरे म्हणाले.
ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात त्याने प्रतिज्ञापत्र दिले आहे, असेही अँड. घुमरे यांनी म्हटले आहे. आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वाझे याने पैसे दिले असे तो सांगत नाही. त्यामुळे वाझे याने यंत्रणेकडे दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकार्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो, असे अॅड. घुमरे म्हणाले.
वसुलीचे पैसे सचिन वाझे यांना देण्यात आल्याचा जबाब बार मालकांनी ईडीकडे नोंदवला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असे सचिन वाझे सांगत होता.
नंबर वन म्हणजे नक्की कोण, याचा खुलासा ईडीच्या अधिकार्यांना होत नव्हता. त्याचा खुलासा सचिन वाझे याच्या नुकत्याच नोंदवलेल्या जबाबातून झाला आहे. नंबर वन म्हणजे अनिल देशमुख हेच असल्याचे सचिन वाझेने आपल्या जबाबात सांगितल्यांची माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.
सचिन वाझे यांनी नाव फोडलेले 'नंबर वन' साहेब हे अनिल देशमुख नाहीत, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा आरोप अॅड. घुमरे यांनी केला आहे.
अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र, ते राहून गेले. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असेही अॅड. घुमरे यांनी यावेळी सांगितले.