Mumbai Metro Rain Plan
मुंबई : मान्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईची दैना उडविल्याने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर, सावध झालेल्या सरकारने आता पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
एमएमआरडीए, मेट्रोच्या सर्व प्राधिकरणांनी आपापसात समन्वय ठेवतानाच मुंबई महापालिकेशीही सतत संपर्क आणि समन्वय ठेवावा. कुणीही कुठल्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.
मुंबईतील मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी पालकमंत्री शेलार यांनी एमएमआरडीए कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल यांच्यासह मुंबई महापालिका आणि संबंधित प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यासाठी एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन मदत सेवेसाठी अविरत सेवा देण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. 114 किलोमीटरमधील बॅरिकेड हटविण्यात आले, 19 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 107 ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत यासह पावसाळ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत देण्यात आली.
ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश यावेळी दिले. भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या. दुर्दैवाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा गाड्यांची गती कमी झाली तर अंधेरी, घाटकोपरसारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन प्रवाशांना बाहेर काढणे, तसेच अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत एक आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकार्यांना दिले.