

मुंबई : मिलिंद कारेकर
सोन्या-चांदीच्या आभूषणांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या झवेरी बाजारातच शनिवारी (दि.18) धनत्रयोदशीला तब्बल ३६ टन सोन्याची खरेदी-विक्री झाली. देशभरात सोन्या-चांदीचा व्यवसाय तब्बल ४६००० कोटींच्या पार गेला असावा, अशी माहिती इंडियन नॅशनल बुलियनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.
सोन्याचा दर दोन लाख रुपयांच्याही पुढे जाईल आणि फायदा होईल या आशेने धनत्रयोद-शीला लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली असू शकते. याचे कारण सोन्या-चांदीची नाणी आणि बार विकत घेण्याकडे मोठा कल होता. त्या तुलनेत दागिन्यांची खरेदी कमी झाल्याचे कुमार जैन यांनी सांगितले.
दरम्यान, सोन्या-चांदीचा भाव आणि जीएसटी टॅक्स कमी करण्याची मागणी मुंबईतील सराफांनी उचलून धरली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच झव्हेरी बाजारातील सराफांनी ही मागणी केली. सोन्याचांदीचे वाढते दर आणि दागिन्यांवरील जीएसटी टॅक्स यामुळे सामान्य नागरिकांना सोने-चांदी खरेदी करणे अवघड झाले आहे. अनेकांच्या घरातील लग्नकार्य, साखरपुडे अशा कार्यक्रमांचा खोळंबा झाला आहे, असे त्यांचे म्हणणे असल्याचे कुमार जैन म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोन्याचा दर आवाक्यात आणला नाहीतर येत्या काळात सोने २ लाख रुपयांच्याही पार जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. सोन्या-चांदीच्या दागिन्यावरील २ वेळा आकारण्यात येणारा जीएसटी टॅक बंद करावा किंवा आणखी कमी केला पाहिजे, म्हणाले.