पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस (Dhanteras) दिवशी सोने- चांदी खरेदीची परंपरा आहे. यामुळे या दिवशी सोन्याची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI on Dhanteras) ब्रिटनमधून १०२ टन सोने आणले. बँक ऑफ इंग्लंडने १०२ टन सोने आरबीआयच्या नावाने पाठवले. याआधी आरबीआयने ब्रिटनमधून मे महिन्यात १०० टन सोने आणले होते. सप्टेंबर अखेरपर्यंत आरबीआयकडे एकूण ८५५ टन सोने होते. यातील ५१०.५ टन सोने भारतात ठेवण्यात आले होते, अशी माहिती परकीय चलन साठा व्यवस्थापनाच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) खुलासा केला की, त्यांनी लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून आणखी १०२ टन सोने आणले. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय परदेशात ठेवलेले सोने भारतात आणत आहे; जेणेकरून सोने सुरक्षित राहील. सरकारमधील अनेकांचा असा विश्वास आहे की सोने आपल्या देशातच ठेवणे अधिक सुरक्षित आहे.
सप्टेंबर २०२२ पासून, भारताने परदेशात ठेवलेले २१४ टन सोने परत आणले आहे. हे पाऊल आरबीआय आणि सरकारची संपत्ती आपल्या देशातच आपल्या जवळ ठेवण्याला प्राधान्य दर्शवते. सध्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सोन्याच्या साठ्यातील काही भाग देशात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सोने आपल्या देशातच ठेवल्याने ते अधिक सुरक्षित राहील.
या सोन्याच्या वाहतुकीसाठी गुप्तता आणि आधुनिक सुरक्षा उपायांची आवश्यकता असते. ज्यात विशेष विमाने आणि सुरक्षित प्रोटोकॉलचा समावेश असतो. ब्रिटनमधून सोने गोपनीयरित्या विमाने आणि अन्य माध्यमातून आणले जाते. आधीच्या काळात, आर्थिक संकटात भारत सरकारला तारण म्हणून सोने गहाण ठेवावे लागत होते. पण, यावेळी हे पाऊल आर्थिक आणीबाणी म्हणून नाही तर देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्याच्या सक्रिय धोरणाचा एक भाग आहे.
सध्या, भारताचा ३२४ टन सोन्याचा साठा बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या देखरेखीखाली आहे. या दोन्ही बँका ब्रिटनमध्ये आहेत. जगात बँक ऑफ इंग्लंड हे सोने साठा ठेवण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते. १६९७ पासून ही बँक जगभरातील सोने साठा ठेवत आहे.