

पवई : पवई परिसरात पुन्हा एकदा धोकादायक रस्त्याने तरुणाचा बळी घेतला आहे. पवई प्लाझा, जेव्हीएलआरसमोर सोमवार (दि २७) रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राहुल राजेश विश्वकर्मा (वय २४) असे अपघातातील मृत तरूणाचे नाव आहे.
राहुल पवई तलाव येथे छटपूजा आटोपून आपल्या बहिणीसह विक्रोळी येथे घरी परतत होता. दरम्यान, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असमान आणि पॅच असलेल्या रस्त्यावरून त्याची दुचाकी घसरली, त्यात तो रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या खाजगी बसने त्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, धोकादायक रस्त्यामुळे गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी मृत्यूची घटना आहे. लालू कांबळे, देवांश पटेल या दोन जणांचा अश्याच प्रकारे खड्डे आणि खराब रस्त्याने बळी घेतला होता. आता ही तिसरी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी ते रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत. तातडीने रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.