

Yogesh Kadam Comment On Anil Parab :
शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पुण्यातील फरार गुंड सचिन घायवळला राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनंतर शस्त्रपरवाना मिळाला असा गंभीर आरोप केला होता. यावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत मी याबाबत कागदपत्र दाखवेन असं सांगितलं.
माध्यमांशी बोलताना योगेश कदम म्हणाले, 'सचिन घायवळसाठी मी शिफारस दिलेली नाही. मी याबाबतचे कागदपत्र दाखवेन. सचिन घायवळवर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याच्यावर पूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातून न्यायालयानं २०१९ त्याला दोषमुक्त केलं होतं.'
योगेश कदम अनिल परबांना उद्येशून म्हणाले, 'त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स जेव्हा इशू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीनं इशू होतं. मी याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार आहे.'
योगेश कदम यांनी मी खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित किंवा गुन्हा दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला लायसन्स दिलेलं नाही. गुन्हा असलेल्या एकाही व्यक्तीला मी लायसन्स दिलेलं नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जे आरोप झाले आहेत त्याबाबत सर्व कागदपत्र घेऊन माहिती देईन असंही कदम म्हणाले. त्यांनी पत्रकारांचे प्रश्न घेणं टाळलं.
दरम्यान, योगेश कदम यांची प्रतिक्रिया येण्यापूर्वी त्यांचे वडील रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्या आरोपांचे खंडन केलं. त्यांनी अनिल परब हे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या मागं हात धुवून लागले आहेत असं सांगितलं.
त्यांनी केबल व्यवसाय असलेल्या अनिल परबांकडे इतकी संपत्ती कशी आली. त्यांच्या नावावर किती बोगस कंपन्या आहेत. त्यांनी मराठी माणसाला लुबाडून संपत्ती कमवली आहे असा आरोप देखील केला. याचबरोबर माझ्या पत्नीनं सर्व सांगितलं तरी अनिल परब आरोप करत आहेत. माझी पत्नी खरी की अनिल परब असा सवाल देखील केला.
अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांच्या शिफारसीनंतरच सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यात आला विशेष म्हणजे, पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्रपरवाना नाकारला होता. त्यानंतर त्याचं अपील हे योगेश कदम यांच्याकडं गेलं. त्यांनी सचिन घायवळची सर्व पार्श्वभूमी माहिती असताना देखील शस्त्र परवाना कसा दिला असा सवाल केला. तसंच त्यांनी यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. या प्रश्नाबाबत शिवसेना रस्त्यावर देखील उतरणार असं अनिल परबांनी सांगितलं आहे.