पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील संशयित आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शाहला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या बीएमडब्ल्यू कारने स्कुटीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. आज त्याला मुंबईतील न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली.
मिहीर (वय २४) हा शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. राजेश शाह यांनाही वरळी पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
७ जुलै रोजी वरळीतील ॲनी बेझंट रस्त्यावर बीएमडब्ल्यूने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा यांना स्कूटीसह जवळपास १.५ किमीपर्यंत फरफरट नेले. या घटनेत नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप जखमी झाले होते.
कावेरी प्रदीप नाखवा यांचा बळी घेणारा मिहीर राजेश शाह हा अपघातापूर्वी दोन ठिकाणी दहा ते बारा पेग दारू प्यायला आणि तिही अपुरी पडली म्हणून की काय बीएमडब्ल्यू चालवतानाही तो बिअर पित होता... तशी कबुलीच त्याने पोलिसांना दिली.
वरळी हिट अँड रनचा भयंकर प्रसंग वरळी पोलिसांनी पुन्हा उभा केला होता. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी मूळ घटना पुन्हा उभी करताना मिहीर राजेश शाह आणि त्याचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत हे दोघेही पोलिसांसोबत उपस्थित होते. दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. दारुच्या नशेत बीएमडब्ल्यू कारमधून जाताना मिहीरने वरळीच्या ॲनी बेझंट रस्त्यावर नाखवा यांच्या स्कुटीला धडक दिली. मिहीरने कावेरीला १.५ किमीपर्यंत फरफटत नेले. हा प्रकार लक्षात येताच वरळी सी लिंकच्या अलीकडे दोघेही कारमधून खाली उतरले. मिहीरने अपघाताच्या वेळेस तो कार चालवत असल्याची कबुली देताना मद्यप्राशन केले नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर अपघाताचा प्रसंग पुन्हा उभा केल्यानंतर मिहीर दारुच्या नशेत गाडी चालवत होता हे स्पष्ट झाले. तशी कबुलीच त्याने पोलिसांना दिली.
१० जुलै रोजी शाहला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. "तो कोणाला भेटला, गुन्हा घडल्यानंतर तो कुठे गेला होता, याची कोणतीही माहिती त्याने दिलेली नाही. त्याने नंबर प्लेट फेकून दिली. त्याने आपले केस का कापले याबद्दल कोणतीही माहिती नाही," असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. अटक टाळण्यासाठी मिहीरने दाढी केली आणि केस कापले, असे पोलिसांनी न्यायालयात याआधी सांगितले होते.