

मुंबई: वरळी येथील २५,५४३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा सेंच्युरी मिलचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी खासगी कंपनीला भाड्याने देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी सुधार समितीमध्ये मंजूर करण्यात आला. पेडर रिॲलिटी या कंपनीसोबत १ हजार ३५१ कोटींचा करार करण्यात आला.
सदर प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला. प्रस्तावातील त्रुटींवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
सेंच्युरी मिल भूखंडाच्या प्रस्तावामागे अदृश्य शक्तींचा हात आहे, सत्ताधाऱ्यांनी मुंबई विकायला काढली,असा घणाघाती आरोप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील सदस्यांनी केला. मात्र बहुमतांच्या जोरावर सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी सदर प्रस्ताव मंजूर करताच, संतप्त विरोधकांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून निषेध नोंदवला. यामुळे सभेत काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.
सेंच्युरी मिलच्या भूखंडावरील हक्क मिळवण्यासाठी पालिकेने अनेक दशके कायदेशीर लढा दिला होता. भूखंडावरील १०, ९२९ चौरस मीटरवरील क्षेत्रफळाच्या मनोरंजन मैदानाचे आरक्षण बदलण्यात येणार आहे, भूखंडावरील रहिवाशांची पात्रता निश्चित केल्याशिवाय, त्यांच्या मागण्या ऐकल्याशिवाय भूखंडाचा प्रस्ताव आणण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे, असा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेने सुधार समितीत जोरदार आक्षेप घेतला.
हा प्रस्ताव ठरवून कुणासाठी तरी आणला जातोय. या मागे अदृश्य शक्ती आहे. पेडर रिअॅलिटी ही जिंदालची कंपनी आहे. या कंपनीला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचा भूखंड स्वस्तात देऊन एकप्रकारे लॉटरी लावून दिली आहे. एका विशिष्ट माणसाला टेंडर मिळावे हा अट्टाहास कशासाठी? या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आणि सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.
प्रशासनाचा रात्रीस खेळ चाले विशाखा राऊत
उबाठा पक्षातील नगरसेविका विशाखा राऊत यांनी सदर प्रस्तावावर बोलतांना म्हणाल्या की, अनेक चांगल्या कंपन्यांना डावलून एका विशिष्ट कंपनीला कसे काय पात्र ठरवले. आधीच्या आयुक्तांनी निवृत्त व्हायच्या आदल्या रात्री प्रस्तांवावर सह्या केल्या. रात्रीस खेळ चाले, तसा त्यांनी कारभार केला. चार रात्री एमएसचा सगळा स्टाफ तिथे राहिला होता.
त्यावेळी अनेक प्रस्ताव क्लिअर केले. हा त्यातलाच एक प्रस्ताव. त्यांना एवढी काय घाई होती, यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेच्या मालकीच्या जागा खाजगी विकासकांच्या घशात कशाला घालायच्या. त्यावर आजवर पुनर्वसनातून किती घरे मिळाली, याची माहिती द्या, असेही राऊत म्हणाल्या.
मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव;
सेंच्युरी मिलच्या भूखंडाच्या बोलीत पात्र ठरलेल्या पेडर रिएॅलिटीचा ५१ टक्के हिस्सा जिंदाल स्टीलने खरेदी केला आहे. नवीन जिंदाल हे भाजपचे खासदार आहेत, हा मुद्दा कॉंग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मांडला.
या भाडेकरारातून पालिकेचे हजारो कोटींचे नुकसान होतंय. तिथल्या मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा हा डाव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करा किंवा रिटेंडर करा, अशी सूचना अशरफ आझमी यांनी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात भूखंड विकले जात आहेत, असे यापूर्वी कधी झाले नाही. याबाबत नगरसेविका मेहर हैदर यांनी संताप व्यक्त केला.