

मुंबई : लैगिंक अत्याचारानंतर एका 46 वर्षांच्या सेक्सवर्कर महिलेची हत्या केल्याप्रकरणी चंद्रपाल रामखिलाडी ऊर्फ नेता नावाच्या एका आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. नेता हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून लैगिंक अत्याचारानंतर झालेल्या वादानंतर त्याने या महिलेची हत्या करुन घटनास्थळाहून पळ काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 25 सप्टेबरला मालाड, मालवणी, मार्वे रोडवरील सावंत कंपाऊंडजवळ मालवणी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता.
तपासाअंती या महिलेवर लैगिंक अत्याचार करुन तिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस टिम उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशासह इतर राज्यात गेली होती.
याच दरम्यान उत्तरप्रदेशात गेलेल्या टिमने चंद्रपाल याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.