

जयंत धुळप
रायगड: भारताचा पारंपरिक काथ्या (कॉयर) उद्योग आज राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर नवनवे टप्पे गाठत आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या धोरणांमुळे गेल्या १० वर्षांत या क्षेत्राच्या निर्यातीत देशपातळीवर ३०५ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे.
या व्यावसायिक यशात कोकण विभाग अग्रस्थानी असून, स्थानिक महिलांसाठी हा उद्योग रोजगाराची संजीवनी ठरत आहे. देशातील २१,००० हून अधिक नोंदणीकृत काथ्या युनिटस् आणि ७ लाखांहून अधिक रोजगारांपैकी तब्बल ८० टक्के वाटा महिलांचा आहे. नारळाच्या करवंट्यांपासून मौल्यवान उत्पादने बनवून या महिला राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत थेट योगदान देत आहेत.
केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाची ‘काथ्या विकास योजना’ (सीव्हीवाय) कोकणातील महिला उद्योजकांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. गेल्या १२ वर्षांत ६८,००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार, कोकणात ४५ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड आहे.
कोकणातील चारही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमधून प्रतिवर्षी सुमारे २५ ते ३० कोटी नारळांचे उत्पादन घेतले जाते. शहाळे, सुके खोबरे, काथ्या आणि इतर उपउत्पादने मिळून कोकणातील नारळ क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे ६०० कोटी ते ८०० कोटी रुपयांच्या घरात जाते. यामध्ये केवळ शहाळ्यांच्या विक्रीतून वर्षाला ३५० कोटींहून अधिक रोख उलाढाल होते.
नारळ उत्पादक क्षेत्र व जाती
कोकणात नारळ उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, दापोली, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड, तर ठाणे जिल्ह्यातील वसई आणि डहाणू हे प्रमुख तालुके आहेत. गोड पाणी व मऊ खोबरे या साठी प्रसिद्ध श्रीवर्धनी रोशा, वादळ-रोधक स्थानिक जात म्हणून नाव मिलवलेला बाणवली व उच्च उत्पादनासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘प्रताप’ या नारळाच्या प्रमुख जाती आहेत.
भविष्यातील संधी
ग्रामीण भागातील १ लाखाहून अधिक शेतकरी व मजुरांचा रोजगार यावर अवलंबून आहे. व्हर्जिन कोकोनट ऑईल (व्हिसीओ), नीरा, नारळाचे दूध, पावडर आणि पॅकेज्ड नारळ पाणी यांसारख्या प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास ही वार्षिक उलाढाल १५०० कोटी रुपयांच्या पार जाऊ शकते. आधुनिक यांत्रिक उपकरणांचा वापर आणि कृषी पर्यटनाची जोड यामुळे कोकणातील नारळ शेतीला अधिक समृद्धी मिळू शकते.
काथ्यापासून तयार होणाऱ्या वस्तू
पायपुसणी आणि मॅटस्
दोर आणि दोरखंड
उश्या आणि गाद्या
भांडी घासायचे ब्रश, कपड्यांचे ब्रश
साफसफाईचे झाडू
कोकोपीट
जिओ-टेक्स्टाईल
टोपल्या आणि वॉल हँगिंग्ज
गाड्यांच्या सीटस्