

मुंबई : म्हाडा फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याप्रकरणी बेला मॅलवीन डिसुझा या महिलेस समतानगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आल्यानंतर तीन वर्षांनी तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यांत आश्विन कारवा आणि केदार सुधाकर साटम हे दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार कांदिवलीत राहत असून ते व्यावसायिक आहेत. या फ्लॅटची विक्री करून त्यांना मोठा फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या भावाने त्यांची ओळख केदार साटम आणि आश्विन कारवा यांच्याशी करुन दिली होती. त्यांची म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना म्हाडामध्ये फ्लॅट मिळवून दिले आहे,असे समजले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना म्हाडाचा एक फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याची विनंती केली होती.