

मुंबई : देशाचे संविधान बदलण्याचे आणि संविधानाने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था संपविण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग बनून काँग्रेस आणि त्याचे कच्चेबच्चे रोज आंदोलन करत आहेत, ‘रेजीम चेंज’चा नारा देत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत मुंबईत आयोजित पदयात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, ‘रेजीम चेंज’चे इरादे नेस्तनाबूत करून संविधानावरील संकट दूर होईपर्यंत थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत महायुतीने छत्रपती शिवाजी पार्कजवळील सेनापती बापट यांच्या पुतळ्यापासून कामगार मैदानापर्यंत पदयात्रा काढली. संविधान बदलाचा आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचा काँग्रेसचा जुना मनसुबा असल्याचे सांगतानाच काँग्रेसच्या लोकशाहीविरोधी कृत्यांचा पाढाच फडणवीस यांनी वाचून दाखविला.
काँग्रेस आणि त्याचे सहकारी वारंवार ‘रेजीम चेंज’चा नारा देत असतात. गव्हर्न्मेंट चेंजचा अर्थ एक सरकार बदलायचे आणि दुसरे सरकार आणायचे, असा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे. मात्र, ‘रेजीम चेंज’चा अर्थ राजकीय व्यवस्था बदलणे, संविधान बदलणे आणि देशामध्ये उभ्या असलेल्या सर्व संस्था बदलणे, असा होतो. केवळ सत्तांतर आणि संपूर्ण व्यवस्था बदलणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सध्या देशात ‘रेजीम चेंज’च्या माध्यमातून संविधान आणि लोकशाही व्यवस्थेला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेजारील बांगला देश, नेपाळ आणि श्रीलंकेत ‘रेजीम चेंज’ झाल्यानंतर संविधान, राजकीय व्यवस्था बदलण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अनुराग ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्यासह भाजप, शिंदे गटाचे नेते, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंना ‘रेजीम चेंज’चा अर्थ माहिती आहे का?
आमचे उद्धव ठाकरे पण ‘रेजीम चेंज’ म्हणाले; पण उद्धवजींना ‘रेजीम चेंज’चा अर्थ तरी माहिती आहे की नाही, हे मला माहिती नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.