माझ्याकडे प्लॅन तयार; महायुतीचे सरकार पुन्हा विधानसभेत आणू : फडणवीस

माझ्याकडे प्लॅन तयार; महायुतीचे सरकार पुन्हा विधानसभेत आणू : फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, याची कारणे शोधून काढून महायुतीचे सरकार पुन्हा विधानसभेत आणू. त्यासाठी माझ्याकडे प्लॅन तयार आहे. मी पळणारी व्यक्ती नाही, तर लढणारी व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थिती मी शांत बसणार नाही, असा निर्धार व्य़क्त करून मला सरकारमधून मोकळे करा, हे नैराश्यातून मी बोललो नाही, तर माझ्या डोक्यात काही रणनीती आहे, या संदर्भात बोललो, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.८) केला. मुंबईतील दादर येथे आयोजित भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत कोणता निर्धार केला?

  • लोकसभेतील पराभवाची  कारणे शोधून काढू
  • महायुतीचे सरकार पुन्हा विधानसभेत आणू.
  • त्यासाठी माझ्याकडे प्लॅन तयार आहे.
  • मी पळणारी व्यक्ती नाही, तर लढणारी व्यक्ती आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, जनतेने पुन्हा एकदा एनडीए आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पंडीत नेहरू यांच्यानंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

अपयश ताकदीने अंगावर घ्यायचे असते,

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. यशाचे बाप अनेक असतात. अपयश ताकदीने अंगावर घ्यायचे असते, निवडणुकीत नेतृत्व मी करत असल्याने या अपयशाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळेच मी सरकारमधून मला मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली होती. परंतु दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते अमित शहा यांनी मला यापुढे जोमाने काम करण्यास सांगितले. माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्याबद्दल आभारी आहे.

काही रणनीती माझ्य़ा डोक्यात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे, मी निराश झालो नाही, काही स्ट्रॅटेजी माझ्याकडे आहे. काही रणनीती माझ्य़ा डोक्यात आहे. त्यामुळे मला सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केली होती. आता नव्याने पेरण्यांची वेळ आली आहे. निवडणुकीत आपली काही राजकीय गणिते चुकली. परंतु, कारणांचा शोध घेऊन विधानसभेत पुन्हा महायुतीचे सरकार आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या खोट्या कथानकाला प्रत्युत्तर देण्यात कमी पडलो.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप संविधान बदलणार आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले, पक्षांची फोडाफोडी केली, असा अपप्रचार केला. हा प्रचार इतका खाली पोहोचला की आम्हाला त्यास काऊंटर करता आले नाही. विरोधकांच्या खोट्या कथानकाला प्रत्युत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. परंतु, असे खोटे मुद्दे प्रत्येक निवडणुकीत चालत नाहीत. मुंबईत मराठी माणसाने ठाकरे गटाला मदत केली नाही. तर एका विशिष्ट समाजाच्या मदतीने त्यांच्या जागा निवडून आल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कोकण, ठाणे, पालघर येथे ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही.

कोकण, ठाणे, पालघर येथे ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही, तेथील जनतेने महाविकास आघाडीला हद्दपार केले. येथे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याचे दिसून आले नाही. मुंबईत २४ लाख मते महाविकास आघाडीला पडली आहेत. तर २६ लाख मते महायुतीला पडली आहेत. तर राज्याचा विचार केला असता ४३.९ टक्के मते महाविकास आघाडीने घेतली आहेत. तर ४३.६ टक्के मते महायुतीने घेतली आहेत. २ कोटी ५० लाख मते महाविकास आघाडीला तर २ कोटी ४८ लाख मते महायुतीला पडली आहेत. म्हणजे केवळ २ लाख मते आमच्यापेक्षा अधिक आहेत. राज्यात आमच्या जागांचा १, २, ३ टक्के अशा फरकाने पराभव झाला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news